भाऊसाहेब चौधरी गेल्या काही वर्षांपासून नाशिक शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. चौधरी हे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून मानले जायचे. त्यामुळेच भाऊसाहेब चौधरी यांची गच्छंती हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. भाऊसाहेब चौधरी आज रात्री ९.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश करणार आहेत.
नाशिकमधून ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला शिंदे गटाने सुरुंग लावत ठाकरेंना धक्का दिला होता. त्यानंतर ज्यांच्याकडे नाशिकची संपर्कप्रमुख जबाबदारी होती त्या भाऊसाहेब चौधरींची आता पक्षातून जरी हकालपट्टी करण्यात आली असली, तरी देखील ठाकरे गटासाठी हा एक धक्काच समजला जात आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची संघटनात्मक पातळी मजबूत असल्याचे चित्र दिसत होते, परंतु आता नाशिकमधील चित्र माजी बारा नगरसेवकांच्या प्रवेशानंतर बदलेले आहे. भाऊसाहेब चौधरी हे फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा पक्षश्रेष्ठींना लागल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊत यांचे ट्वीट काय?
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, असे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा : आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची ती करा, राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना ताकीद