ऑफर शिंदे गटाची, पण प्रवेश भाजपात; फडणवीसांनी भिडू हेरला, राजेश टोपेंचंही टेन्शन वाढवलं

जालना : जालन्याच्या राजकारणात नवा भिडू दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ऑफर होती, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सतीश घाटगे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने जालन्याच्या राजकारणात तगड्या उमेदवाराची भर पडली आहे. विधानसभेसाठी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहू शकते, तर परभणी लोकसभेसाठी शिवसेनेसमोर नवा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो.

येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी खेळी खेळली आहे. परभणी लोकसभा आणि जालन्यातील घनसावंगी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवून या मतदार संघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी फडणवीस यांनी जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांना भाजपात प्रवेश देऊन मोठी ताकद या मतदारसंघात उभी केली आहे.

घनसावंगी मतदार संघ हा विधानसभेसाठी जालना जिल्ह्यात तर लोकसभेसाठी परभणी जिल्ह्यात जोडला गेलेला आहे. विधान सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभेला शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात दोन साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या घाटगे पाटील यांच्या प्रवेशाने या मतदार संघात भाजपच्या पाठीमागे घाटगे पाटील यांच्या रूपाने मोठी ताकद मिळाली आहे.

या मतदार संघावर आपलं वर्चस्व निर्माण व्हावं म्हणून शिंदे गटाकडूनही मोठे प्रयत्न सुरू होते. समृद्धी गणेश फेस्टिव्हलच्या कार्यक्रमा दरम्यान शिंदे गटाचे उपनेते, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी चक्क कार्यक्रमा दरम्यानच सतीश घाटगे यांना शिंदे गटात येण्याचं जाहीर आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे घाटगे शिंदे गटात जातील अशा चर्चा होत होत्या. परंतु सतीश घाटगेंच्या भाजप प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी प्रस्थापित राजेश टोपे यांच्यासाठी विधानसभेसाठी हे मोठे आव्हान असू शकते.

त्यातच काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समृद्धी शुगर इंडस्ट्रीजच्या समृद्धी विकास परिवर्तन पॅनलने पहिल्याच प्रयत्नात घनसावंगी विधान सभा मतदार संघात २१ ठिकाणी पॅनल उभे करून १३ ठिकाणी सरपंच पदाच्या धुरा सांभाळत विजय मिळवल्याने प्रस्थापित राजकीय नेत्यांना मोठा धक्का मिळाला असून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानसभा आणि लोकसभा मतदार संघात मोठी ताकद निर्माण करण्याच्या दृष्टीने शिंदे गटाला धक्का देत घाडगे यांचा भाजपात प्रवेश करून घेत आतापासूनच या विधान सभा आणि लोकसभा मतदार संघावर आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी साखर कारखानदार असलेल्या घाटगे पाटील यांना प्रवेश दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे, याच नावाने रिया चक्रवर्तीला ४४ फोन; शिंदेंच्या खासदाराचा लोकसभेत गौप्यस्फोट

शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदार संघात मोठा राजकीय डाव खेळण्याचा भाजपचा इरादा असल्याच्या चर्चाना घाटगेंच्या प्रवेशाने उधाण आलं आहे. आता या मातब्बर व वजनदार नेत्याला भाजपा परभणी लोकसभा मतदार संघात उमेदवारी देणार की विधानसभेला घनसावंगी मतदार संघात राजेश टोपेंच्या समोर उमेदवार म्हणून उभे करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण या निमित्ताने भाजपा या दोन्ही ठिकाणी नवं आव्हान उभं करून आपली ताकद वाढवू लागले आहे हेही तेवढंच खरं.

हेही वाचा : संजय राऊतांच्या निकटवर्तीयाची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

Source link

Devendra Fadnavisjalna satish ghatge patilMaharashtra Political NewsRajesh Topesatish ghatge patil joins bjpUddhav Thackerayजालना घनसावंगी मतदारसंघदेवेंद्र फडणवीसराजेश टोपेसतीश घाटगे पाटील जालना
Comments (0)
Add Comment