उद्यापासून भरणार हुडहुडी?; राज्यातील या भागांत पुढील पाच दिवस थंडीचा कडाका जाणवणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्यामध्ये अजूनही डिसेंबरच्या सरासरीइतके तापमान खाली उतरलेले नाही. मात्र शुक्रवारपासून राज्याच्या काही भागांत थंडीचा कडाका जाणवू शकेल, असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक असेल. दरम्यान, मुंबईमध्येही किमान तापमानात किंचित घट झाली असून, मंगळवारी सांताक्रूझ येथील किमान तापमानाचा पारा पुन्हा २०च्या खाली उतरला. त्यामुळे किमान डिसेंबरअखेरीस पुन्हा एकदा थंडीची जाणीव होण्याची शक्यता आहे.

काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान पाच दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकेल, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. उर्वरित महाराष्ट्रात थंडी असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल असेही त्यांनी सांगितले.

सांताक्रूझ येथे मंगळवारी किमान १९.६ नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा १.६ अंशांनी अधिक आहे. कुलाबा येथे २३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. हे तापमानाही सरासरीपेक्षा २.३ अंशांनी अधिक आहे.

मध्य महाराष्ट्रात सध्या १३ ते १७ अंशांदरम्यान किमान तापमानाची नोंद होत आहे. जळगाव, महाबळेश्वर येथे मंगळवारी किमान तापमान सोमवारपेक्षा अधिक होते. मराठवाड्यामध्येही औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी १३ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान किमान तापमानाची मंगळवारी नोंद झाली. फक्त औरंगाबाद येथे १०.२ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. मंगळवारच्या नोंदींनुसार केवळ औरंगाबादमध्ये किमान तापामानाचा पारा सरासरीहून १.२ अंशांनी कमी आहे. विदर्भामध्ये यवतमाळमध्ये सरासरीहून किमान तापमान ३ अंशांनी कमी नोंदले गेले. यवतमाळ येथे ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. उर्वरित विदर्भात १३ ते १४.५ अंशांदरम्यान किमान तापमानाची नोंद झाली.

कोकण विभागातील केंद्रांवर सोमवारपेक्षा किमान तापमान किंचित खाली उतरले. मात्र हे तापमान अजूनही सरासरीपेक्षा १.५ ते २ अंशांनी अधिक आहे. रत्नागिरी येथे सरासरीपेक्षा १.२ अंशांनी किमान तापमान खाली उतरून १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून नाताळदरम्यान तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. मात्र महाराष्ट्रात याचा फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असू शकेल.

Source link

maharashtra weather forecastMumbai weather forecastmumbai weather news today in marathimumbai weather today warningweather mumbai today live
Comments (0)
Add Comment