“दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे, कोणता मंत्री दोषी आहे समोर आलंच पाहिजे…” अशा घोषणांनी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा दणाणून सोडली. दिशाच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार? असा सवाल शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आक्रमक होऊन नितेश राणे यांनी कुणाच्या दबावापोटी याप्रकरणाचा तपास थांबला आहे? असा सवाल करुन या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करावी, अशी मागणी केली.
“दिशा सालिनयच्या मृत्यू प्रकरणात कुणाला वाचवलं जातंय? या प्रकरणाची चौकशी का होत नाही? दिशाच्या पीएम रिपोर्टमध्ये काय आहे, तेही लपवलं जातंय, याची चौकशी होणार आहे का? मुंबई पोलिसांवर कोणाचा दबाव होता? याप्रकरणातलं सत्य लोकांच्या समोर का येत नाही? तिच्या व्हिजिटिंग बुकची पानं फाडलं गेली? तिच्या फोनवर AU नावाचे कॉल आहेत? तिच्या मृत्यूनंतर तिच्या इमारतीखालील CCTV फुटेज डिलीट करण्यात आले? यामागे नक्की आहे? हे जनतेला कळलंच पाहिजे”, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
“आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. सीबीआयकडे अद्याप वर्ग झाले नाही. या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे. ८ जून रोजी काय झाले, दोनवेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले?” अशा प्रश्नांची सरबत्ती नितेश राणे यांनी केली.