काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद उफाळून आला असून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेने आता सभागृहात ठराव घेऊन या वादाला आणखी फोडणी दिली आहे. ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे. महाजन अहवाल सादर होऊन ६६ वर्षे झाली आहेत. दोन्ही राज्यांतील जनतेत सौहार्दपूर्ण वातावरण आहे. कर्नाटकची भूमी, पाणी, भाषा आणि कन्नड जनतेच्या हिताच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,’ अशी भूमिका बोम्माई यांनी ठराव मांडताना मांडली. कर्नाटकातील जनता आणि सभागृहाचे सदस्य यांची एकच भावना आहे.याला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सगळे मिळून घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ. महाराष्ट्र अनावश्यक सीमावाद उकरून काढत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. राज्याचे हित जपण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,’ असे या ठरावात म्हटले आहे.
काही दिवसांतील महाराष्ट्रातील नेत्यांच्या वक्तव्यांचाही निषेध करण्यात आला. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देशद्रोही असून, ते चीनचे एजंट आहेत, असे वाटते. त्यामुळे चीनप्रमाणे हल्ला करू, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. अशा तऱ्हेची प्रक्षोभक विधाने त्यांनी पुन्हा केली तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही बोम्मई यांनी दिला. या वेळी महाराष्ट्रातील नेत्यांचा एकमताने निषेध करण्यात आला.
इंचभर जमीनही महाराष्ट्राला देणार नाही; कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नावर ठराव
बेळगाव : राज्याच्या हितांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहोत आणि शेजारी राज्यांना एक इंच जमीन देणार नाही, असे म्हणत कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नावरील ठराव मंजूर करण्यात करण्यात आला.