शनिवार- रविवारी मुंबईत थंडीची तीव्रता अधिक असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विकेंडला मुंबईचा पारा १६ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये ऑक्टोबर हिट सारख्या उन्हाच्या तीव्र झळा सोसल्यानंतर मुंबईकरांना आता थोडा दिलासा मिळणार आहे. राज्यात थंडी पुन्हा परतू लागली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई भारतातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंद झाली होती. तेव्हा मुंबईचे तापमान १३ अंश इतके होते. मात्र, आता तापमानात उतार होत आहे.
गुरुवारी मुंबईतील तापमान २० अंश इतके नोंदवले गेले होते. येत्या काही दिवसात या तापमानात आणखी उतार होण्याची शक्यता आहे. २४ डिसेंबर ते २६ डिसेंबरमध्ये वातावरणात गारवा वाढण्याची शक्यता आहे. या काळात तापमान १६अंशपर्यंत असेल, असं भाकित हवामान विभागाने वर्तवलं आहे.
वाचाः परदेशातून भारतात येताय; केंद्र सरकारने जारी केली नवी नियमावली, राज्य सरकारही अॅलर्ट
दरम्यान, काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान पाच दिवस थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकेल, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. उर्वरित महाराष्ट्रात थंडी असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल असेही त्यांनी सांगितले.
वाचाः इंजेक्शन नव्हे आता नाकावाटेही घेता येणार लस, केंद्राने दिली मंजुरी, नेझल व्हॅक्सिनचे फायदे जाणून घ्या