ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पहिलंच अधिवेशन संपन्न होत आहे. तसेच कोरोनानंतरच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच उपराजधानी नागपुरात अधिवेशन पार पडतंय. १९ तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. योगायोगाने मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षसंघटनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर त्यांनी विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
पक्षातील नेते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका, त्यांना मार्गदर्शन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने पक्षाची रणनीती आखण्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले आहेत. मात्र पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटण्याच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे विधिमंडळाच्या दिशेने रवाना झाला. राज ठाकरेंना रिसिव्ह करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार आले होते. शिंदे गट-भाजपच्या काही आमदारांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या.
मुख्यमंत्र्यांशी सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेत राज ठाकरे यांनी विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा केली. विधिमंडळ कामकाजाविषयी माहिती घेतली. दरम्यान, आमदार राजू पाटील देखील राज ठाकरेंना विधिमंडळ कामकाजाविषयी माहिती देत होते.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूर विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट घेतली. यासमयी विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.
मनसेचं ट्विट
मनसे अध्यक्ष राज ठाकर नागपूर दौऱ्यावर आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याचंच औचित्य साधून राज ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्यांची सदिच्छा भेट घेतली.