भारतीयांना ओमायक्रॉनच्या बीएफ.७ विषाणूचा धोका किती?; डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्टच सांगितलं

चीनमध्ये ‘ओमायक्रॉन’च्या जातकुळीतील ‘बीएफ.७’ विषाणूच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आपल्या देशातही भीतीचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. असे असले, तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘घाबरून जाऊ नका,’, असा सल्ला दिला आहे. ‘मास्क वापरा, बूस्टर डोस घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुस्तफा आतार यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद….

चीनमध्ये आलेल्या ‘बीएफ.७’ या विषाणूच्या संसर्गाविषयी काही सांगाल का?

भारतात ओमायक्रॉनचा ‘बीए.२’ आणि ‘बीए.५’ या विषाणूंचा संसर्ग होऊन गेला आहे. लसीकरण आणि या विषाणूच्या संसर्गामुळे हायब्रीड रोगप्रतिकारशक्ती तयार झाली आहे. चीनने तयार केलेली लस ही भारतीय लशीपेक्षा कमी परिणामकारक आहे. ‘सायनोव्हॅक’, ‘सायनोफार्म’ नावाच्या लशी ‘कोव्हॅक्सिन’सारख्या होत्या. गेल्या वर्षी ब्राझील, इंडोनेशिया, सौदी अरेबियामध्ये या लशीच्या चाचण्या झाल्या. त्यात त्यांची परिणामकारकता ५० ते ६० टक्के असल्याचे आढळून आले. कमी परिणामकारकतेमुळे लसीकरण होऊनही पुरेसे संरक्षण झाले नाही.

चीनमधील ‘बीएफ.७’ या विषाणूची लाट कधीपर्यंत राहील?

भारतात आलेला ‘कोव्हिड-१९’चा पहिला विषाणू, त्यानंतर ‘डेल्टा’ आणि ‘ओमायक्रॉन’ची लाट ही चार ते पाच महिने राहिली. देशात टप्प्याटप्प्याने निर्बंध घालण्यात आले. लॉकडाउनच्या काळात आपण आरोग्य यंत्रणा सक्षम केली. रुग्णालयांचे विस्तारीकरण, खाटांच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला. मात्र, चीनमध्ये आरोग्य यंत्रणा ‘जैसे थे’ राहिली. ही त्यांची मोठी चूक झाली. त्यामुळे सध्या चीनच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून, तेथील संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. चीनमध्ये वृद्धांची संख्या अधिक असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. साधारणतः सहा आठवड्यांपर्यंत या विषाणूची लाट राहील. चीनमधील संसर्ग झपाट्याने वाढेल आणि कमीही होईल.

‘बीएफ.७’ हा विषाणू म्युटेट होईल का? नवे विषाणू येतील का?

‘बीएफ.७’ या विषाणूचे स्वरूप (म्युटेशन) फारसे बदलणार नाही. त्यामुळे नव्याने कोणताही विषाणू तयार होईल, असे वाटत नाही. छोटे-मोठे यापुढेही येत राहतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

पुण्यासह राज्यात आणि देशात नव्या विषाणूची काय स्थिती असेल?

देशात ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे प्रमाण खूप आहे. संसर्गामुळे शरीरातील अँटिबॉडी कमी झाल्या, तर नव्याने संसर्ग होऊ शकतो. मात्र, त्याची तीव्रता वाढत असल्याचे दिसून आलेले नाही. चीनच्या तुलनेत भारतात ओमायक्रॉन ‘बीएफ.७’ या विषाणूचा धोका कमी आहे. आपल्याकडील ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लशी अन्य देशांतील लशीच्या तुलनेत खूप परिणामकारक आणि सुरक्षित आहेत. देशात ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतरही फार त्रास झाला नाही. त्यामुळे चीनमध्ये निर्मिती होणाऱ्या नव्या विषाणूंचा धोका भारताला होऊ शकत नाही. मात्र, विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागिरकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

Source link

bf 7 variantCoronavirus outbreakCovid-19 Variant BF.7New Covid Variant found in IndiaRaman Gangakhedkar
Comments (0)
Add Comment