बनावट सही करून १२ लाख ५० हजार लुटले
मुंबईत राहणाऱ्या थोरल्या वकील भावाला धाकट्या वकील भावाने चक्क १२ लाख ५० हजार रुपयांना चुना लावला. वकील भाऊ अनेक वर्ष घरी आला नसल्याने भावाने दोन बँकांमध्ये ठेवलेले १२ लाख ५० हजार रुपये बनावट सहीच्या आधारावर काढले. यासाठी दोन्ही बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले, असा आरोप करत पीडित वकील भावाने मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मलकापूर शहरातील मोहनपुरा भागात रहिवासी तथा सध्या मुंबईत राहणारे अॅड. अब्दुल सलीम अब्दुल समद शेख यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (बीडीसीसी) शाखा मलकापूर आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापूर येथे बँक खाते आहे.
दोन्ही बँकांमध्ये त्यांचे १२ लाख ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट होते. बीडीसीसी बँकेत २ लाख ७५ हजार रुपये फिक्स डिपॉझिट तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रत्येकी १ लाख रुपयांच्या सहा एफडी तसेच ठेवीवरील व्याज, भाडे आणि शेतीतून मिळणारे उत्पादनातून मिळालेली रक्कम जमा होती. ते व्यवसायानिमित्त कायमस्वरूपी मुंबई येथे राहतात. मात्र, आजारपणामुळे मलकापूर येथे बँकेमध्ये जाऊन चौकशी करण्याकरता ते आले होते.
दोन्ही बँक खात्यांची चौकशी केली असता समजले की त्यांचा लहान भाऊ अॅड. मोहमद जावेद अब्दुल समद (मलकापूर) याने बीडीसीसी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून डिपॉझिट रक्कम काढण्यासाठी खोटे दस्तऐवज व खोट्या सह्या केल्या. त्याने स्वतःच खातेधारक असल्याचे भासवले विशेष बाब म्हणजे, अधिकाऱ्यांना माहिती होते की तो खरा खातेधारक नाही. तरीसुद्धा बँक अधिकाऱ्यांनी लाच घेऊन मोहमद जावेद अब्दुल समद याला वेळोवेळी मदत केली, असा आरोप अब्दुल सलीम यांनी केला. १२ लाख ५० हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुल सलीम अब्दुल समद यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.