विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. शुक्रवारचं कामकाज आटपून जयकुमार गोरे आपल्या मतदारसंघात जात होते. पुण्यातून साताऱ्याच्या दिशेने जात असताना पहाटे त्यांची फॉर्च्युनर गाडी ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. आज पहाटे तीन वाजता साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला.चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे गाडीचालक आणि स्वीय सहाय्यक यांना बराच मार लागला आहे. गोरेंच्या छातीला, पाठीला आणि हाताला मार लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच गोरेंनी अपघातानंतरचा पहिला फोन केला. त्यांच्या फोननंतर खासदार निंबाळकर पुढच्या ५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहिलेली भीषण परिस्थिती खासदार निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. ते म्हणाले “पहाटे ३ वाजता जयकुमार गोरे यांनी मला फोन करुन त्यांचा अपघात झाल्याचं सांगितलं. माझा फलटणजवळ अपघात झालाय पण मला लोकेशन सांगता येणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतरच्या पुढच्या ५ ते ७ मिनिटांत मी अपघातास्थळी पोहोचलो. त्यांची गाडी ५० फूट नदीत पडली होती. पोलिसांच्या मदतीने तत्काळ आम्ही त्यांना गाडीबाहेर काढलं. त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांच्या गाडीतील सगळे सीट्स तुटले होते. त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी पुण्याचा नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत मी स्वत: पुण्याला आलो”
गाडीत जे जे कुणी होते, त्यांना पहिल्याप्रथम रुग्णवाहिकेत बसवून तत्काळ हॉस्पिटलला हलवलं. नंतर जयकुमार गोरेंना घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने रवाना झालो. रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायेत. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी न करता मतदारसंघातच थांबावं, असं आवाहन निंबाळकर यांनी केलं.