अकोला जिल्ह्यात सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अकोला जिल्ह्यातील २६५ ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे कारभारी जाहीर झाले असून यात २५८ सरपंचांचाही समावेश आहे. दरम्यान, या ग्रामपंचायत निवडणुकीत अकोल्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या खामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. अनेक वर्षापासून सरपंच पदावर असलेले बाबुलाल गुंजकार यांच्या पत्नी यांचा निवडणुकीत पराभव झाला अन् नंदा काळे हे विजयी झाले.
गेल्या ३० वर्षापासून हातात असलेली सत्ता गमावल्याने गुंजकार कुटुंबियांना हे पचले नाही. याचाच राग मनात धरून खामखेडचे माजी सरपंच बाबुलाल गुंजकार यांचा भाऊ सुरेश धोंडूराम गुंजकार (वय ४५ वर्ष, रा. खामखेड) याने हातात तलवार घेऊन गावात दहशत माजवली. हा प्रकार काल शुक्रवारी सकाळी घडला. या दरम्यान, काळे कुटुंबातील कृष्णा राजीव काळे (वय २४ वर्ष ,रा. खामखेड) हे सदस्य किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुरेशने संपूर्ण गावात तलवार घेऊन मतदारांना म्हणजे ग्रामस्थांना शिवीगाळ केली अन् मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालेले नंदा काळे कुटुंबातील सदस्यांची वाद घातला. या प्रकरणी पातूर पोलीस स्टेशनमध्ये सुरेश गुंजकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरेश हा घटनेपासून फरार आहे. तर काळे कुटुंबाविरुद्ध गुंजकार कुटुंबायांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलीस तक्रार केली असून ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
काय आहे नेमकी घटना ?
आरोपी सुरेश याने हातात तलवार घेऊन कृष्णा यांच्या आजी कुसुमबाई शेळके यांना शिवीगाळ करून कृष्णा यांच्याशी वाद घातला आणि आजीच्या हाताचे बोटे पिरगळली. कृष्णा यांनी सदरचा प्रकार पाहून लगेच आवरण्यासाठी गेले. मात्र, आरोपीने त्यांना धक्काबुक्की करून झटापट केली. सदर झटापटीमध्ये आरोपीच्या हातातील तलवारीने कृष्णा यांच्या छातीजवळ खरचटले आहे.