बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मादनी येथे चोरट्यांनी कपाट्याची चावी न मिळाल्याने थेट कपाटच उचलून नेले. परंतु प्रयत्न करूनही कपाट उघडून त्यात काहीच न मिळाल्याने चोरट्यांनी कपाट चक्क गावालगत टाकून तेथून काढता पाय घेतला. ही घटना २५ डिसेंबर रोजी उघडकीस आली. पहाटे गावाकडे नागरिकांना हे कपाट दिसले तेव्हा घडलेला प्रकार समोर आला.
गावातील सुभाष चव्हाण हे कामानिमत्त बाहेर असल्याने त्यांचे घर सध्या बंद आहे. हीच संधी साधत चोरटे त्यांच्या वाड्यात शिरले. चोरट्यांनी तेथे चोरीचा प्रयत्न केला. मात्र शोधूनही चोरट्यांना कपाटाची चावी सापडली नाही. त्यामुळे चोरट्यांनी चक्क घरातले हे कपाट उचलून गावानजच्या गोदरीत नेले. तेथे कपाट उघडून त्यात काही मौल्यवान वस्तू सापडते का याची तपासणी केली. पण चोरट्यांना त्यात काहीच सापडले नाही. त्यामुळे चोरटयांनी कपाट तसेच तेथे टाकून पलायन केले.
वाचाः बळीराजा चिंताग्रस्तच! नऊ महिन्यांत २,१३८ शेतकऱ्यांनी संपवले जीवन, उपाययोजनानंतरही टोकाचे पाऊल
२५ डिसेंबर रोजी सकाळी काही माणसांनी गोदरीत कपाट पाहिल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. सुभाष चव्हाण यांच्या मुलीचे कुंकू लावण्याचा कार्यक्रम मेहकर येथे असल्याने दोन दिवसांपासून हे कुटुंब मेहकर येथे होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला. दरम्यान सुभाष चव्हाण यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. व घरातील सामान असतातव्यस्त असल्याचे दिसल्याने चोरीच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आला.
वाचाः चीनमध्ये करोनाचा विस्फोट; रोज दहा लाख रुग्ण पॉझिटिव्ह, काही दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होण्याची भीती
दरम्यान घरातील वस्तूची पाहणी केली असता इतर सामान सुरक्षित होते. चव्हाण यांनी डोन गाव पोलिसात तोंडी तक्रार दिली आहे. पण या चोरीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.
वाचाः आरोप करणाऱ्या महिलेचे ‘डी’ गँग, पाकिस्तानशी संबंध; खासदार राहुल शेवाळेंचा दावा