कांदिवलीची वाहतूककोंडी अखेर फुटणार; महापालिका खर्च करणार तब्बल सात कोटी, काय आहे प्लॅन

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवीन पूल बांधण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. कांदिवली पश्चिम येथील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी पोयसर नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका ६ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपये खर्च करणार आहे.

अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग व शेकडो नवीन वाहनांची भर यामुळे मुंबईत वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्या पश्चिम उपनगरात असून त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी असते. परिणामी पश्चिम उपनगरात वाहतूककोंडीची समस्या अधिक आहे. ही कोंडी फोडण्यासाठी कांदिवली पश्चिम स्थानकाला जोडणाऱ्या विकास नियोजन रोडजवळ हा पूल बांधण्यात येणार आहे.

या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराने पावसाळ्यासह १५ महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. पूल उभारणीच्या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांसाठी पालिकेने नियमावली जाहीर केली आहे. काळ्या यादीमध्ये असलेल्या किंवा ज्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यांना निविदा भरता येणार नाहीत. तसेच पालिका, केंद्र, राज्य सरकार, निमसरकारी संस्था, केंद्रीय किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमामध्ये तत्सम स्वरूपाचे काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास पालिकेत नोंदणी बंधनकारक आहे.

कार्यादेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांत नोंदणी न केल्यास इसारा रक्कम ठेव जप्त किंवा वसूल करण्यात येईल आणि कंत्राट मूल्याच्या एक किंवा १० हजारांहून जे अधिक असेल ते वसूल करण्यात येईल. पालिकेच्या नागरी/यांत्रिकी आणि विद्युत विभागाकडे नोंदणी नसल्यास त्या कामांसाठीही विचार केला जाणार नाही, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

Source link

development plan 2034kandivali traffic poisar kandivali traffic planmumbai traffic update todayकांदिवली ट्रॅफिकमुंबई महानगरपालिका
Comments (0)
Add Comment