पुण्यात २४१०, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प येथे हा तय्यबीया मुलांचा अनाथ आश्रम आहे. येथे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी रवाना करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी तय्यबीया अनाथ मुलांचे आश्रम (ट्रस्ट) या चार मजली असणाऱ्या इमारतीत तळमजल्यावर आग लागल्याचे पाहून मोठ्या प्रमाणात धूर झाल्याचे निदर्शनास आले. त्याबरोबर जवानांनी तातडीने इमारतीत असणाऱ्या जवळपास १०० मुलांना (वय ०६ ते १६ वर्षे) आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवून मोठा धोका दूर केला. तर दुसरीकडे आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या १० मिनिटात आग आटोक्यात आणली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पोहोचत कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
धान्यासह इतर सामानाचे झाले नुकसान
या आगीमधे इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचे व इतर काही साहित्याचे नुकसान झाले आहे. आग मध्यम स्वरुपाची असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली अशी हाती आली आहे.
या कामगिरीत पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते, तांडेल – चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल – आसिफ शेख, वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप, पंकज रसाळ यांनी सहभाग घेतला.