राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाचा आदेश आला तर कसब्यातून पोटनिवडणूक लढण्याची तयारी दर्शविली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अप्रत्यक्षरीत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना फटकारलं आहे.
एखाद्या राजकीय नेत्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या दशक्रिया विधी होण्याआधीच निवडणुकीची चर्चा करणे हे पुण्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही. यामुळे कोणीही याबाबत वक्तव्य करू नये, अशा पद्धतीची चर्चा पक्षात खपून घेतली जाणार नाही. असं जगताप म्हणाले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हे असं असताना मुक्ता टिळक यांचा दशक्रिया विधी झालेला नसतानाही मागील तीन-चार दिवसांमध्ये त्यांच्या जाण्याने जी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे ती बिनविरोध निवडून द्यावी म्हणून भाजपमधील काही मंडळी बोलायला लागले आहेत. तसेच इतर राजकीय पक्षातील नेते मंडळींनीही देखील चर्चा सुरू केलेली आहे. ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना दिली आहे. या संदर्भामध्ये कोणीही कुठलंच भाष्य करू नये. अशा चर्चा पक्षात अजिबात खपून घेतल्या जाणार नाहीत. दशक्रिया विधी होण्याआधीच अशा चर्चा होणे हे पुणेकर म्हणून लाज वाटणारे आहे. पुण्याची राजकीय संस्कृती फार वेगळी आहे. पुण्याने राज्याला आणि देशाला नेहमीच चांगल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जर माझ्या पक्षाकडून किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून अशा पद्धतीची घाईने निरर्थक चर्चा होत असेल, तर हे पुण्याचा संस्कृतीला धरून नाही. हा पुण्याच्या संस्कृतीचा अपमान आहे. खरंतर कुठल्याच राजकीय पक्षाच्या जाण्यानंतर लगेच अशी चर्चा व्हायला नको. असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
काय म्हणाल्या होत्या रुपाली पाटील ?
मुक्ताताई यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक लागणार आहे ती पक्षाने आदेश दिला तर मी लढणार आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासून मुक्ता टिळक या आजारी होत्या. या आजारपणात देखील मुक्ता टिळक यांना जेवढं शक्य होतं तेवढं काम त्यांनी केलं आहे. आता पोटनिवडणूक झालीच तर मतदार ठरवतील नक्की कुणाला निवडून द्यायचं, पण पक्षाने आदेश दिला तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी करायला पाहिजे ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणुका बिनविरोध केल्या आहेत. याआधी पंढरपूरची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर मुंबईत झालेल्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना किती त्रास झाला आणि तो कोणी दिला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आताची ही पोटनिवडणूक हसत खेळत झाली पाहिजे, असंही रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : संजय राऊतांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, फडणवीसांनी विरोधकांच्या चुकांचा पाढाच वाचला
मनसेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माझं तिकीट ऐनवेळेस ज्या कारणासाठी कापलं ते कारण म्हणजे मुक्ता टिळक या होत्या. मुक्ता टिळक यांना भाजपकडून न्याय देण्यासाठी तिकीट दिलं होतं आणि या कारणानेच मनसेने माझं तिकीट कापलं, असा मोठा गौप्यस्फोट रूपाली पाटील यांनी केला. त्यावेळेस आम्ही कॉम्प्रमाईज केलं कारण मुक्ता टिळक या आमच्या सहकारी होत्या, असंही रूपाली पाटील सांगायला विसरल्या नाहीत.
हेही वाचा : दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला, माजी पीएचा खळबळजनक आरोप