हायलाइट्स:
- कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा एक ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार
- गेले तीन महिने स्थगित होती विमान सेवा
- इंडिगो कंपनीकडून दिली जाते ही विमानसेवा
कोल्हापूर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले तीन महिने स्थगित असलेली कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा एक ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांची तिरूपतीला दर्शनासाठी जाण्याची सोय होणार आहे.
इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा दिली जाते. ७५ आसन क्षमतेची ही सेवा तीन महिने बंद होती. १ ऑगस्ट अर्थात येत्या रविवारपासून ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. सकाळी ११.४५ वाजता हे विमान तिरूपतीतून निघून १.४० वाजता कोल्हापुरात उतरेल. नंतर २.१० वाजता कोल्हापुरातून निघून ४.०५ मिनिटांनी तिरूपतीला पोहोचेल.
जिल्ह्यात काय आहे महापुराची स्थिती?
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे पूरपरिस्थिती आटोक्यात आली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुटावर आली असून अजूनही ६४ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ते आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोमवारी पुणे ते बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला. मंगळवारी कोल्हापूर ते सांगली, कोल्हापूर ते केर्ले रस्ताही सुरू झाला. पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. मुंबई व पुणे महापालिकेचे टँकर मदतीसाठी आलेले आहेत.