मंडणगड पोलीस ठाणे अंमलदार म्हणून त्यांनी रात्रभर ड्युटी केली होती. ड्युटी संपवून सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते घरी आले. त्यांनी नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ घरच्या मंडळीनी श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले, पण दुर्दैवाने तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
वर्षभरापूर्वीच संदीप गुजर यांची मंडणगड पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांच्या अशा अचानक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. एक चांगला आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेला सहकारी निघून गेल्याची शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस हवालदार असलेले संदीप गुजर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी वृत्तीचे होते. संदीप गुजर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील होते. मात्र त्यांनी अलिकडे खेड तालुक्यातील गुणदे आवाशी येथे आपल्या आजोळी त्यांनी नवीन वास्तू बांधली होती.
संदीप गुजर यांच्या पश्चात पश्चात पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या मातोश्री, मुंबई पोलीसमध्ये असलेले भाऊ, पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या पत्नी साक्षी गुजर व मुलगा असा मोठा परिवार आहे. संदीप गुजर यांनी घेतलेली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली.
यापूर्वीही पोलीस कर्मचाऱ्यांचा ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलिसांना कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्याची अलिकडच्या काळातील या परिसरातील ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. पोलिसांवरती वाढता ताण तणाव यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा : बाईकला वाचवण्यासाठी ड्रायव्हरची शिकस्त, बस खड्ड्यात घातली, दाम्पत्य थोडक्यात बचावलं
चारच दिवसांपूर्वी ५६ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक युवराज कृष्णा भालेराव यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे समोर आले होते. ते सोलापूर-पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सुट्टीसाठी मामाच्या घरी गेले असताना त्यांना हार्ट अटॅक आला. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ या गावात त्यांची प्राणज्योत मालवली. युवराज भालेराव यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : मित्रासोबत जाताना बाईकवरुन पडली, २२ वर्षीय युवतीचा मृत्यू, तरुणाला अटक