एक जानेवारीला घरी येणार होता नाशिकचा जवान, पण चारच दिवस आधी धडकली वीरमरणाची बातमी

नाशिक : नाशिकचे सुपुत्र असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान शहीद झाल्याने जिल्ह्यावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी जनार्दन उत्तम ढोमसे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जनार्दन ढोमसे यांनी भारतमातेसाठी प्राण पणाला लावले. एक जानेवारीला ते घरी परतणार होते, मात्र त्याच्या काही दिवस आधीच त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जनार्दन ढोमसे हे निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी होते. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगाव येथेच झाले होते. जनार्दन यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. त्यामुळे १२ वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले.

जनार्दन यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी सेवा दिली. तीन वर्षानंतर त्यांची सेवा संपणार होती. मात्र त्यांना काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा तसेच पत्नी रोहिणी, मुलगा पवन (वय ८ वर्ष), मुलगी आरु (वय २ वर्ष), भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे.

जनार्दन ढोमसे हे एक जानेवारीला घरी येणार होते. मात्र त्या आधीच त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आल्याने कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. भारत मातेने एक वीर पुत्र गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : VIDEO | कुंकवाची साथ का सोडा? पती गमावलेल्या मीनाताईंना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील रहिवासी असलेल्या जवानाचा आसाम येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आज आणखी एका नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्राला कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : रात्रभर ड्युटी, सकाळी कुटुंबासोबतचा नाश्ता ठरला अखेरचा, हेड कॉन्स्टेबलचा शोकाकुल अंत

Source link

jammu kashmirjanardan dhomase martyrMaharashtra news todaynashik jawan martyrजनार्दन ढोमसेनाशिक जवान शहीदनाशिक निफाड जवान वीरमरण
Comments (0)
Add Comment