हायलाइट्स:
- राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकांसाठी कंबर कसली.
- ठाणे येथे मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत दिल्या सूचना.
- निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षात येणाऱ्यांना दिली समज.
ठाणे: मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतानाच पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांनाही त्यांनी कठोर संदेश दिला आहे. राज यांनी घेतलेला पवित्रा पाहता पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच तिकीट वाटपात प्राधान्य दिले जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. ( Raj Thackeray In Thane Latest Update )
वाचा:मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?; राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर
राज ठाकरे यांनी आधी नाशिक, नंतर पुणे आणि आता ठाणे येथे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच राज यांनी संघटनात्मकदृष्ट्या काही महत्त्वाच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. निवडणुका जवळ आल्या की इनकमिंग आणि आऊटगोइंगला उधाण येते. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात. त्याअनुषंगाने राज यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करणार असेल तर अजिबात चालणार नाही. मग जो कुणी असेल त्याने मनसेत प्रवेश करू नये, असे अगदी स्पष्ट शब्दांत राज यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांबाबत राज यांचे इरादे वेगळेच असल्याचे स्पष्ट संकेतही यातून मिळाले आहेत.
वाचा: उद्धव ठाकरे एक दिवस देशाचं नेतृत्व करतील, राऊतांच्या विधानावर पवार म्हणाले…
राज यांनी आजच्या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. याबाबत १५ दिवसांनंतर पुन्हा ठाण्यात येऊन ते आढावा घेणार आहेत. ठाणे पालिकेत १३१ इतकं संख्याबळ आहे. त्यानुसारच वॉर्ड आणि शाखाअध्यक्ष हवेत. ती संख्या वाढवणं योग्य ठरणार नाही. शाखा अध्यक्ष सर्वात महत्त्वाचा असून तो एकप्रकारे पक्षाचा कणा आहे, असे राज यावेळी म्हणाले. पक्षातील मरगळ झटकून नव्या दमाने काम करण्याबाबत सूचनाही यावेळी राज यांनी दिल्या. सोशल मीडियाचा वापर कमी करताना स्थानिक माध्यमं आणि पत्रकारांच्या माध्यमातून तुमचं काम सर्वांपर्यंत पोहचू द्या. पक्षात जुने नवे असे वाद मला नकोत. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशी समजही राज यांनी दिली.
वाचा:राज्यपालांचे पुस्तक पुरात वाहून गेले की काय!; संजय राऊत यांचा हल्लाबोल