उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान सीमाप्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका-एका आरोपाला आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘माझे वडील चोरले, असं ते म्हणतात. मात्र त्यांनी तर आपल्या वडिलांचे विचारच विकले आहेत,’ असा हल्लाबोल शिंदे यांनी केला. तसंच जे घरातून बाहेरही पडत नाहीत, त्यांनी हिम्मत या शब्दावर बोलावे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
जयंत पाटलांच्या वक्तव्याचा दाखला
विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांना उद्देशून गंमतीने राष्ट्रवादीची शिवसेना असं म्हटलं होतं. या वक्तव्याचा दाखला देत आज एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आम्ही जे सांगत होतो, तेच आता जयंतरावांनीही सांगितलं आहे की शिवसेनेची राष्ट्रवादी झाली आहे आणि त्यावर भास्कर जाधवही हो-हो असं म्हणत होते.’
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आजच्या भाषणातही आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एक व्यक्ती चुकेल, दोन चुकतील, दहा चुकतील, ५० कसे चुकतील, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसंच बाळासाहेबांना अपेक्षित काम आम्ही करतो म्हणून रेशीमबागेमध्ये गेलो, गोविंदबागेत नाही गेलो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीबाबत खुलासा केला.