हायलाइट्स:
- शहीद नीलेश महाजन यांच्यावर धुळ्यातील गावी अंत्यसंस्कार
- नीलेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर
- मणिपूर-बांगलादेश सीमेवर झालेल्या गोळीबारात झाले होते जखमी
म. टा. वृत्तसेवा । धुळे
मणिपूरला लागून असलेल्या बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले धुळ्याचे जवान नीलेश महाजन यांच्यावर आज सकाळी धुळ्यातील सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोनगीर गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू येथील रहिवासी असलेले नीलेश महाजन सध्या सोनगीर येथे वास्तव्यास होते. २०१६ साली ते सैन्य दलात भरती झाले होते. मणिपूरला लागून असलेल्या बांगलादेश सीमेवर ते तैनात होते. नोव्हेंबर २०२० मध्ये इम्फाळ पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या विष्णूपूर भागात झालेल्या गोळीबारात नीलेश जखमी झाले होते. त्यांच्यावर गुवाहाटी येथील आर्मी रुग्णलयात मागील आठ महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. महाजन यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र काही प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पार्थिव आणण्यास विलंब लागला. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बुधवारी त्यांचं पार्थिव सोनगीर येथे आणण्यात आलं. पार्थिव सोनगीरमध्ये येताच नीलेश यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी अक्षरश: हंबरडा फोडला. नवीन आदिवासी आश्रम शाळेला लागून असलेल्या पटांगणात नीलेश याना अखेरची सलामी देण्यात आली. त्यानंतर साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
वाचा: मनसेमध्ये बदलाच्या मोठ्या हालचाली; अमित ठाकरे नाशिकमध्ये
महाजन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने आले होते. ‘अमर रहे, अमर रहे… शहीद नीलेश महाजन अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नीलेश यांच्या घरापासून ते अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणापर्यंत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. देशभक्ती पर गीते सादर करीत महाजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाजन कुटुंबातील दुसरा शहीद
नीलेश यांचे कुटुंब पहिल्यापासून देश सेवेत आहे. नीलेश यांचे वडील अशोक महाजन देखील सैन्यदलात होते. त्यांचे काका दिलीप महाजन हे १९९४ मध्ये दहशतवाद्यांशी लढताना श्रीनगर येथे शहीद झाले होते.आता नीलेश यांनी देशासाठी बलिदान दिले. काका-पुतण्याने देशासाठी बलिदान देत समाजापुढे नवा आदर्श घालून दिल्याची भावना आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.
ही आहे मागणी
नीलेश महाजन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. नीलेशच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. महाजन कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळं नीलेश यांच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सोनगीर ग्रामस्थ आणि आमदार जयकुमार रावल यांनी केली आहे.
वाचा: पंतप्रधान मोदींच्या फ्लेक्समुळे महापालिकेसमोर पेच, कारवाई सुरू करताच…