कामगार पुतळा येथून शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना बंदी राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
सिव्हील कोर्ट ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी संगमवाडी येथील रेल्वे क्रॉसिंगवर वायडक्ट टाकण्याचे काम रेल्वेच्या मंजुरीसाठी प्रलंबित होते. ते काम करण्यास रेल्वे प्रशासनाने मेट्रोला परवानगी दिली आहे.
एक ते १९ जानेवारी दरम्यान हे वायडक्ट टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी कोर्टाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारा रस्ता या कालावधीत बंद राहणार आहे. वाहन चालकांनी सिमला ऑफिस चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक आणि आरटीओ चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
संगमवाडी येथील रेल्वे क्रॉसिंगवर काम करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे. पुढील वीस दिवसांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ते ब्लॉक मिळाले आहेत. या कामासाठी योग्य नियोजन केल आहे. छोटे-छोटे ब्लॉक घेऊन काम केले जाणार आहे.
रेल्वे क्रॉसिंगवर काम करण्यास मेट्रोला परवानगी दिली आहे. मेट्रोकडून टप्प्या-टप्पयाने काम केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या प्रभावित होणार नाहीत.