गेल्या आठवड्याभरापासून मावळ तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. यात आज आणखी एक भर पडली. जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे पहाटे साडेपाचच्या सुमारास मावळातील पवनमावळ परिसरातील काले-पवनानगर येथे एका शेतकऱ्याचं एक घर कोसळलं. यात शेतकऱ्याच्या दोन बैलांचा मृत्यू झाला.
विठ्ठल उर्फ बापू गणपत जगताप असं घर पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बापू जगताप यांच्या एकत्र कुटुंबाची मिळून ७ एकर शेती आहे. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी शेतीची कामे करण्यासाठी दीड लाखाला पिंट्या व बबड्या अशी बैलजोडी आणली होती. सहा महिन्यांपासून त्यांचे चांगले पालनपोषण केले होते. नेहमीप्रमाणे सकाळी ते आपल्या बैलांना चारा घालण्यासाठी शेतावर असलेल्या घराकडे गेले असता त्यांना बैलांच्या अंगावर घर कोसळलेले दिसले. बैलांच्या अंगवार विटा, दगड, पत्रे पडल्यामुळे दोन्ही बैल ढिगाऱ्याखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला होता. हे दृश्य पाहून जगताप यांना अश्रू अनावर झाले.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!
दररोज जेवण करून बापू रात्री आपल्या शेतावरील घरावर झोपायला जायचे. मात्र काल पाऊस जास्त असल्याने बापू शेतातील घराकडं फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. तसेच, इतर काही जनावरे त्यांनी रानात सोडल्यामुळे वाचली. या दुर्घटनेत जगताप यांचे घर व बैल असे मिळून जवळपास ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्याचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘सहा महिन्यांपूर्वीच मी ही बैलजोडी घेतली होती. मोठ्या प्रेमानं त्यांचा सांभाळ केला. पण हे असं घडलं. माझी दोन मुलंच गेल्यासारखं झालंय,’ अशी भावना बापू जगताप यांनी व्यक्त केली.