भाजपच्या ‘मिशन १४४’चा दुसरा टप्पा; राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज विदर्भात

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या ‘मिशन १४४’ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज, सोमवारी विदर्भातील चंद्रपूर येथून करणार आहेत. नड्डा चार्टर्ड विमानाने आज सकाळी ११ वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते देवी महाकालीचे दर्शन घेतील. सिव्हिल लाइनच्या न्यू इंग्लिश मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.

चंद्रपूरच्या दौऱ्यात जे. पी. नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित राहणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला, तेथे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नड्डा यांचा हा दौरा आहे.

आगामी २०२४ची लोकसभा निवडणूक वर्षभरावर आहे. सलग तिसऱ्या विजयासाठी भाजपने नियोजनपूर्ण तयारी सुरू केली आहे. ‘मिशन १४४’च्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघांत पार पडले आहेत. सातत्यपूर्ण नियोजनसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपचे प्रमुख नेते या १४४ मतदारसंघांत दौरे करणार आहेत. नड्डा आज दुपारी वेरुळच्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतील. त्यानंतर औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होईल. सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत. ‘मिशन १४४’ लोकसभा अंतर्गत भाजपने राज्यातील १६ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरुर या मतदारसंघांचा समावेश आहे.

Source link

bjp mission 144J P Naddaj p nadda in maharashtrajp nadda chandrapurmission 2024 lok sabha polls
Comments (0)
Add Comment