हायलाइट्स:
- राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील रुग्णालयात दाखल
- नियमित तपासणीसाठी रुग्णालयात; पाटील यांच्या कार्यालयाकडून माहिती
- प्रकृती उत्तम असल्याचाही खुलासा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर उपचारासाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले.
‘जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,’ अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी मंगळवारी पूरग्रस्त सांगलीतील विविध गावांची पाहणी केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीसाठी ते आज मुंबईत दाखल झाले होते.
मोटारसायकलवरून फिरून जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या समस्या
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी मिरज तालुक्यातील कवठेपिरान सावळवाडी, माळवाडी याभागाचा पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला. जयंत पाटील यांनी पाण्याने वेढलेल्या सावळवाडी व माळवाडी गावास मोटार सायकलवरून भेट देऊन पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अन्नधान्याचंही वाटप केलं.