शेकडो विद्यार्थ्यांना मायेनं जेवू घालणाऱ्या गंगूबाई कामावर गेल्या अन् पुन्हा परतल्याच नाहीत!

इरफान खान, सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील फटाका फॅक्टरीमध्ये रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. फॅक्टरीमध्ये रविवारी १० ते १२ कर्मचारी काम करत होते. रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने कमी कर्मचारी कामाला आलेले होते. इतर दिवशी ४० च्या आसपास कर्मचारी काम करत असत. युसुफ हाजी मणियार (रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या मालकीची ही फॅक्टरी आहे. गेल्या १५ वर्षांपासून इंडियन फायर वर्क्स नावाने ही फटाका फॅक्टरी सुरू आहे. रविवारी झालेल्या या भीषण स्फोटात उक्कडगावच्या गंगूबाई सांगळे यांनीही प्राण गमावले. गंगूबाई सांगळे यांच्या मृत्यूने उक्कडगावावर शोककळा पसरली आहे. एका शाळेत भात बनवून देत असल्याने गंगूबाई या भातवाल्या बाई म्हणून ओळखल्या जात होत्या. गंगूबाईंच्या मृत्यूने गावातील शाळेत भातवाल्या बाई कायमच्या गेल्या, असं म्हणत हळहळ व्यक्त केली जात आहे. उक्कडगावकरांनी आपल्या गावची लेक गमावली आहे. मात्र गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांना मायेनं जेवायला देणाऱ्या भातवाल्या गंगूताई गमावल्या आहेत.

गंगूबाईंनी अख्खं कुटुंब सांभाळून प्रपंच चालवला

गंगूबाई सांगळे या पांगरी गावाजवळील उक्कडगावच्या रहिवासी होत्या. नेहमीप्रमाणे त्या रविवारी फटाका फॅक्टरीत कामाला गेल्या. मात्र यात् घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या मृत्यूने अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे. हाताला मिळेल ते काम करून त्यांनी दिवस काढले. मधल्या काळात त्यांनी उक्कडगावच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम केले. अतिशय चांगल्या प्रकारचं जेवण त्या विद्यार्थ्यांसाठी बनवत होत्या. गावातील एक पीढीने शाळेत असताना त्यांनी बवलेला भात खाल्लेला आहे. आईप्रमाणे माया देत त्या भात बनवत आणि विद्यार्थ्यांना खाऊ घालत, असं गावातील लोक सांगतात.

गंगूबाई अल्पभूधारक शेतकरी होत्या

गंगूबाई सांगळे यांचं सासर आणि माहेर पांगरीजवळील उक्कडगाव हेच होते. आई-वडील, सासू-सासरे याच गावचे आहेत. घर चालवण्याची जबाबदारी गंगूबाईंवर होती. मुलगा अंगदचे पालन पोषण गंगुबाई यांनीच केले. आता अंगद सांगळे हे एसटी महामंडळात कार्यरत आहेत. पतीपासून विभक्त राहून गंगूबाई यांनी रोजंदारीने काम करून घर चालवले. गंगुबा या अल्पभूधारक शेतकरी होत्या. शेतीतील उत्पन्न अगदी नगण्य असल्याने त्यांना शेतमजूर म्हणून काम करावे लागत. शेतीत काम नसेल तेव्हा पर्यायी रोजगारासाठी त्या फटाका फॅक्टरीमध्ये काम करत असायच्या. मात्र रविवारी झालेल्या स्फोटात होत्याचं नव्हतं झालं.

Source link

fireworks factorysolapur blast newssolapur latest newsफटाका फॅक्टरी स्फोटसोलापूर ताज्या बातम्यासोलापूर स्फोट
Comments (0)
Add Comment