महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत सर्व प्रकारच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर तरी लगेचच बदल्या करण्यात येतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही आणि पोलिसांच्या बदल्यांसाठी डिसेंबर उजाडला. पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत २५७ पोलिस निरीक्षक, ३३५ सहायक निरीक्षक आणि ८४ उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ९ डिसेंबर रोजी काढण्यात आले. बदल्यांच्या आदेशाला जवळपास महिना होत आला तरी बदल्या झालेले अधिकारी आहे त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. आधी झालेला विलंब आणि आता बदल्या झालेल्या ठिकाणी नियुक्त्या करण्यास चालढकलपणा केला जात असल्याने पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
बदल्या होऊनही सोडण्यात न आलेल्यांमध्ये बहुतांश अधिकारी हे मुंबईतील आहेत. बदली करण्यात आलेल्या २५७ पोलिस निरीक्षकांमध्ये सुमारे ६० आणि ३३५ सहायक निरीक्षकांमध्ये जवळपास शंभर तर, चार ते पाच उपनिरीक्षक मुंबईतील आहेत. मुंबईमध्ये वारंवार महत्त्वाच्या घडामोडी घडतच असतात. त्यातच दहशतवादासंबंधी इशारा कायम असतो. नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. पोलिसांना वर्षअखेरीचा बंदोबस्त करावा लागला. वारंवार काही ना काही कारणे सांगितली जात असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यास तुमच्या ठिकाणी बदली झालेला अधिकारी अद्याप आला नसल्याचे सांगितले जाते, असेही काहींनी सांगितले.
मुंबईत अधिकाऱ्यांची आधीच कमतरता आहे. ज्याप्रमाणे मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे मुंबईबाहेरूनही पोलिसांच्या मुंबईत बदल्या करण्यात आल्या आहेत. हे अधिकारी जसजसे मुंबईत येत आहेत त्याप्रमाणे मुंबईतील अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी सोडले जात आहे.
– विवेक फणसळकर, पोलिस आयुक्त