भुलेश्वर येथील कापड व्यापारी नितेशकुमार (बदललेले नाव) हे काही कामानिमित्त न्यायालयात जात असताना मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ त्यांना एक तरुण भेटला. या तरुणाने नितेशकुमार यांना एक पत्ता विचारला. पत्ता सांगितल्यानंतर शिवकुमार माळी असे नाव सांगणारा हा तरुण त्यांच्याशी बोलू लागला. बोलता बोलता त्याने आपल्याकडील चांदीचे नाणे बाहेर काढले आणि नितेशकुमार यांना दाखविले. अशी सुमारे ३०० नाणी आपल्याकडे असून लवकरात लवकर विकायची आहेत असे सांगून खात्री करण्यासाठी ते नाणे रितेशकुमार यांना दिले. त्यांनी हे नाणे झव्हेरी बाजारात नेऊन तपासणी केली असता खरी चांदी असल्याचे स्पष्ट झाले. शिवकुमार याचा त्यांना फोन आला आणि अचूक असाल तर बोरिवली येथे येण्यास सांगितले. त्यानुसार रितेशकुमार पत्नीला सोबत घेऊन बोरिवली येथे पोहोचले. त्याठिकाणी शिवकुमार याच्यासह आणखी एक तरुण आणि एक महिला होती. आम्ही मजूर असून खोदकाम करताना आम्हाला एक भांडे सापडले असून त्यात चांदीची नाणी आणि सोने असल्याचे त्यांनी सांगितले. सोन्याचा एक लहानसा तुकडा त्यांना दाखवला.
रितेशकुमार यांनी सोन्याचा तुकडा जव्हेरी बाजारात नेवून तपासला असता ते खरे सोने असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी शिवकुमारला संपर्क केला असता त्याने अर्धा किलो सोने आहे आम्हाला तीस लाखांमध्ये विकायचे असल्याचे सांगितले. सुमारे दोन ते अडीच कोटीचे सोने इतके स्वस्तात मिळत असल्याने रितेशकुमार यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून पैशाची जमवाजमव करीत पुन्हा बोरिवली गाठली. शिवकुमार आणि त्याच्या साथीदारांनी सोने ठेवलेली पिशवी रितेशकुमार यांना दिली आणि त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. कोट्यवधींचे सोने लाखात मिळाल्याने खुश असलेले रितेशकुमार झव्हेरी बाजारात हे सोने घेऊन गेले असता तपासणीमध्ये पितळ धातू असल्याचे उघड झाले. त्यांनी शिवकुमार याच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल क्रमांक बंद येत होता. फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.
संशय आला होता पण…
शिवकुमार आणि त्याचे साथीदार सोने विकण्याची घाई असल्याचे वारंवार सांगत होते. यामुळे संशय आल्याने रितेशकुमार यांनी हटकले. मात्र आम्ही उत्तर प्रदेशचे आहोत. आम्ही लवकर गावी जायचे असून इतके सोने चांदी घेऊन प्रवास करू शकत नाही, असे कारण त्यांनी पुढे केले. विशेष म्हणजे त्यांच्या संभाषण कौशल्यामुळे रितेशकुमार यांनाही त्यांचे म्हणणे पटले.