राहुल पाली (वय २७ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नरेंद्र पाली असे गंभीर जखमी झालेल्या काकाचे नाव आहे. संशयित आरोपी सूरज पाली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या खुनाच्या घटनेची नोंद झाली आहे.
पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभूमीसमोर पाली कुटुंबीय वास्तव्यास आहे. ३ जानेवारी रोजी दुपारी त्या ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू होते. अशात संशयित सूरज पाली याचा आपले काका नरेंद्र, चुलत भाऊ राहुल यांच्यासोबत चांगलाच वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
रागाच्या भरात सूरज याने चक्क लोखंडी रॉडने काका नरेंद्र आणि चुलत भाऊ राहुल याच्यावर प्राणघातक हल्ला चढविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात दोघेही खाली पडले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
उपचारादरम्यान राहुल पाली याचा मृत्यू झाल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली. तर गंभीर जखमी असलेल्या नरेंद्र पाली यांच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा : माकडांसोबत सेल्फीचा मोह महागात, पुण्याच्या शिक्षकाचा दरीत पडून मृत्यू
या खून प्रकरणात संशयित सूरज पाली याच्यासह दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे. राहुल पाली हत्या प्रकरणातील संशयीत मारेकऱ्यांची नावे पोलिसांसमोर आली आहे.
हेही वाचा : बिबट्याचा हल्ला नाही, पत्नीला शिट्टी मारल्याने शेजाऱ्याने संपवलं, औरंगाबादेतील गूढ उकललं