Ajit Pawar : महापुरुषांबद्दल मी कधीच वादग्रस्त वक्तव्य केलं नाही, अजितदादा त्या विधानावर ठाम

मुंबई : महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान भाजपच्या राज्यपालांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी आणि प्रवक्त्यांनी केलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मताशी मी सहमत राहणार, असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत. महापुरुषांबाबत मी कधीच बेताल वक्तव्य केली नाहीत. मी महापुरुषांचा अपमान केला असेन तर राजकारण सोडेन, असं अजितदादा म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं. स्वराज्यरक्षण करतो असं म्हणत असताना त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. स्वराज्यात सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. आणि त्यांच्या शौर्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कुठलेही अपशब्द वापरले नाही. त्यामुळे मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. यामुळे विरोधकांनी माझा राजीनामा मागण्याऐवजी ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांच्याबद्दल आंदोलन करणाऱ्यांचं काय मत आहे? हे त्यांनी सांगावं, असा सवार अजितदादांनी भाजपला केला आहे. महापुरुषांचाय अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी?, असा सवालही त्यांनी केला.

अजित पवार दिसेना, कुठे गेले? अशी विनाकारण चर्चा माध्यमांमधून केली जाते. अशा चर्चांना काही अर्थ नाही. मलाही काही खासगी आयुष्य आहे. ज्यांना उत्तर देण्याचीही गरज नाही, अशांबद्दल मी का बोलू? माझी जी भूमिका आहे, तीच सर्वांसमोर मांडणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांबद्दलीची विधानसभेतील भाषणात घेतलेली जी भूमिका मी मांडली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. इतिहासाचं वाचन आणि आकलनावर माझी भूमिका तयार झाली आहे. ती मी विधानसभेत मांडलेली आहे. मी काही इतिहासकार नाहीए. किंवा मी फार काही लिखाण केलंय, असंही नाहीए. मी इतिहासाचा संशोधकही नाही. यामुळे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्यावर युक्तिवाद करण्याची गरज वाटत नाही. तो विषय इतिहास संशोधकांचा आणि अभ्यासकांचा आहे.

‘द्वेषाचं राजकारण करणं मान्य नाही’

राजकीय हेतूनं वातावरण तापवणं आणि द्वेषाचं राजकारण करणं माझ्यासारख्याला कदापी मान्य नाही, असा टोला अजितदादांनी विरोधकांना लगावला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणवं की धर्मवीर? तर त्यांना स्वराज्यरक्षक म्हणावं हीच माझी भूमिका आहे. पण शरद पवारसाहेब म्हणाले, तसं…. कुणी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. धर्मवीर म्हटल्याने छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व मर्यादित होते. स्वराज्यरक्षक हे अधिक व्यापक आणि सर्वसमावेश आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं अजितदादा पुढे म्हणाले.

धर्मवीर उपाधीवरून नाव न घेता मुख्यमंत्र्यांना टोला

मोबाइलमध्ये पाहिलं तर जवळपास सात, आठ लोकांना धर्मवीर ही उपाधी लावली आहे. काहींचे तर चित्रपट निघाले आहेत. आता धर्मवीर भाग २ पण चित्रपट निघणार आहे. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत असाल तर दुसरं कोणी तशी व्यक्ती होऊ शकत नाही. जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापन केली. त्यामुळे दुसरी व्यक्ती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. तशाच पद्धतीने स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. दुसरं कुणाला स्वराज्यरक्षक म्हणता येणार नाही, असं माझं मत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मी खूप मोठी चूक केलेली आहे, असं मला वाटत नाही. मी माझी भूमिका मांडली. ज्याला योग्य वाटतं त्याने स्वीकारावं आणि ज्यांना योग्य वाटत नाही, त्यांनी सोडून द्यावं. पण यावरून मला कोणी शिकवू नये. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा आणि त्यांच्या पक्षाबाबत काय भूमिका घ्यायची ती घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.

Source link

ajit pawar clarificationAjit Pawar Newsbjp maharashtrachhatrapati sambhaji maharajncp maharashtra newsSharad Pawar
Comments (0)
Add Comment