महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘जयोस्तुते’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील मनसेकडून प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शरद पोंक्षे यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली.
भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळत असतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टीका शरद पोंक्षे यांनी केली आहे. पुढे भाषणात बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर बोलण्यावरून निर्माण झालेल्या वादावर टिपणी करत अहिंसेच्या अतिरेकामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे मत मांडले आहे.
मी सावरकरांचे विचार पोहचवत आहे. महापुरुषांबद्दल कोणी अवाक्षर काढू नये अशी सामान्य माणसांची दहशत व्हायला हवी आणि निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी ही दहशत दाखवून द्यायला हवी. महापुरुषांचा अपमान कोणी करता कामा नये. त्यांच्या काळात ती माणसे मोठी होती, त्यांच्याबद्दल बोलायची आपली लायकी आहे का? असा सवाल पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई येथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आलेत. यावेळी मुंबईपेक्षा मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेश मध्ये बनवणार असल्याच्या गोष्टीवर बोलताना पोंक्षे म्हणाले की, त्यांना अधिकार आहे त्यांच्या इकडे फिल्म सिटी उभारण्याचा, परंतु मुंबईच महत्व कधीही कोणीही कमी करू शकत नाही.
सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी नेहमी होताना पाहायला मिळते याविषयी बोलताना काही अपवाद वगळता भारतरत्नांची यादी पाहिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ नकोच असे परखड मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. सावरकरांना भारतरत्न मिळावा ही १० वर्षांपूर्वी माझी देखील मागणी होती. मात्र आता त्यांना भारतरत्न वगैरे नको. राष्ट्राचा, हिंदुंचा विचार करणारे सावरकर हे खरे विश्वरत्न असल्याचे पोंक्षे यांनी निक्षून सांगितले.
जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक भ्रम पसरवण्यासाठीच अर्धवट माहिती पसरवत असल्याचे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. आव्हाड यांनी फक्त त्यांना हव्या त्याच ओळी सांगितल्या. त्यानंतर मात्र सावरकर यांनीच त्याबाबत त्याच पानावर खालच्या ओळींमध्ये जे स्पष्टीकरण दिले आहे, ते मात्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक गाळले. त्यांनी दाखवलेलं पान पलटी करून दुसरं पण वाचलं असतं, तर त्यांना कळलं असत की सावरकरांनी संभाजी राजेंबद्दल किती छान लिहिलंय, असं शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : सुहाना खान आणि अगस्त्या नंदा रिलेशनमध्ये? बच्चन कुटुंबाला भेटली शाहरुखची लेक
पुढे बोलताना पोंक्षे म्हणाले की सावरकरांनी संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि दारुडा असल्याचे बखरीचा आधार घेऊन लिहले होते, परंतु नंतर त्यांचे मत असे होते की धर्मासाठी अनंत यातना सहन करून धर्म परिवर्तन करायला तयार नाही तो व्यक्ती असा स्त्रीलंपट आणि दारुडा असूच शकत नाही, असे सावरकरांनी संभाजी महाराजांवर पीएचडी करत श्री पु गोखले यांना भेटीदरम्यान सांगितले असल्याचे पोंक्षे म्हणाले. तसेच सामान्यांना शहाणं करणं माझ्या हातात आहे आणि मला त्यांना उत्तर द्यायचं नाही असं मत देखील शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री चढणार बोहल्यावर; जिम ट्रेनरसोबत केला साखरपुडा