पुण्यातील श्रीमंत व्यक्तींची फेसबुकवरून माहिती काढून त्यांना व्हॉट्सअॅप कॉल करून अंडरवर्ल्डमधून बोलत असल्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या २४ वर्षीय किरण रामदास बिरादार याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हा मूळचा लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पुण्यात राहतो. तत्पूर्वी त्याच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल आहे. त्यामुळेच त्याने गाव सोडलं. तो गावातून विशाखापट्टणमला गेला आणि तिथे एका हॉटेलमध्ये काम करू लागला. पण तेथील काम सोडून तो पुण्यात दोन महिन्यांपूर्वी आला. पुण्यातील रेल्वे स्थानकातील वेटिंग रूममध्ये तो राहत होता. त्या ठिकाणी बसूनच त्याने खंडणीची योजना आखली आणि त्यासाठी त्याने आधार घेतला फेसबुकचा.
फेसबुकच्या आधारे किरणने पुण्यातील काही श्रीमंत लोकांची माहिती मिळवली. तिथूनच त्याला पाच-सहा लोकांचे फोन नंबर प्राप्त झाले. मुळातच गुन्हेगारी विचारसरणी असलेल्या किरणने येथूनच आपल्या खेळाला सुरुवात केली. त्यानंतर सुरू झाला खंडणी मागण्याचा खेळ. किरण या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल करत होता आणि ‘मी अंडरवर्ल्डमधील भाई बोलत आहे, जीव प्यारा असेल तर खंडणी द्यावीच लागेल,’ अशी थेट धमकी द्यायचा.
किरणला मिळालेल्या नंबरपैकी चार जणांना किरणने सुरुवातीला फोन केले. मात्र या चौघांनेही किरणच्या धमकीला भीक न घालता थेट ब्लॉक केले. मात्र पाचवी शिकार ही किरणच्या गळाला लागली. पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट यांनी किरणकडून आलेल्या पहिल्याच फोनला घाबरून असे काही करू नका म्हणत पैसे देण्याची तयारी दाखवली. हे सावज आपल्या गळाला लागलं आहे, हे किरणने हेरलं. त्याने चार्टर्ड अकाउंटंटला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागितली.
चार्टर्ड अकाउंटंट खूप घाबरले होते, परंतु त्यांच्या मित्रांनी त्यांना धीर देत पोलिसांकडे तक्रार करायला सांगितले आणि त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई सुरू केली. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी संबंधित क्रमांकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तक्रारदारांनी त्याला पैसे कुठे घेऊन येऊ अशी विचारणा केली. सुरुवातीला किरणने १ जानेवारीलाच पैसे घेऊन येण्यास सांगितले. मात्र त्याला संशय आला आणि त्यांनी हा प्लॅन रद्द केला.
अखेर तारीख ठरली ५ जानेवारी आणि वेळ होती पहाटे ४ वाजताची. किरणने तक्रारदारांना महानगरपालिकेजवळील नदीपात्रात पैसे घेऊन बोलावले. दुसरीकडे पोलीस देखील याच परिसरात किरणच्या मागावर होते. स्वतः पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, अधिकारी आणि कर्मचारी हे मॉर्निंग वॉकच्या वेशात याच परिसरात फिरत होते.
किरणने तक्रारदारांना पुन्हा फोन केला आणि पैशाची बॅग जवळील झाडीत ठेवायला सांगितली आणि इथून निघून जा असा दम दिला. तक्रारदारांनी ती पैशाची बॅग झाडीमध्ये ठेवली आणि तिथून बाजूला गेले. पोलीस मॉर्निंग वॉकच्या वेशात खंडणीखोराची वाट पाहतच होते. पण खूप वेळ झाला तिथे कोणी आलंच नाही. खंडणीखोर जवळच असेल या संशयाने पोलिसांनी त्याच भागात रनिंग करायला सुरुवात केली. जेणेकरून खंडणीखोराला कुठलाही संशय येऊ नये.
एवढ्यातच पोलिसांना ब्रिजवरून एक व्यक्ती सतत खाली वाकून पाहात असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांच्या नजरेतून हा गुन्हेगार सुटला नाही. या तरुणाला हेरून पोलिसांनी चहूबाजूनी त्याला वेढा घातला आणि खंडणीखोर आणि पोलिसांमध्ये सुरू असलेला हा पहाटेचा थरार संपला. पोलिसांनी किरणला जेरबंद केलं. पोलीसी खाक्या दाखवतातच किरण बिरादारने आपला गुन्हा कबूल केला. त्याची माहिती घेतल्यानंतर हा कोणी अंडरवर्ल्ड डॉन किंवा गॅंगमधील नसल्याचंही समोर आलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक निरीक्षक विशाल मोहिते, उपनिरीक्षक कांबळे, निखिल जाधव, संजय जाधव, मोहसीन शेख, समीर पटेल, कादिर, तारू तसेच राख व त्यांच्या पथकाने केली आहे.