जोशीमठाची स्थापना आणि धार्मिक महत्त्व
जोशीमठचे प्राचीन नाव कार्तिकेयपूर होते. त्यावेळी जोशीमठ ही कात्युरी राजाची राजधानी होती. जेव्हा आदि शंकराचार्य चार धामांच्या स्थापनेसाठी फिरत होते, त्यावेळी त्यांनी जोशीमठातील तूतीच्या झाडाखाली तप केले आणि येथे ज्योतिषाचे ज्ञान प्राप्त केले. म्हणूनच जोशीमठला ज्योतिर्मठ आणि ज्योतिषपीठ म्हणूनही ओळखले जाते. शंकराचार्यांनीही येथे भगवान नरसिंहाची मूर्ती स्थापन केली होती. कारण जोशीमठ हे भगवान नरसिंहाचे तपस्थानही मानले जाते. पूर्वी जोशीमठ समुद्रात वसले होते अशी आख्यायिका आहे. जेव्हा ते पर्वताच्या रूपात उभे राहिले, तेव्हा भगवान नृसिंहांनी हे आपले तपस्थळ बनवले.
जोशीमठचा रामायण महाभारत काळाशी संबंध
रामायण काळात हनुमानाचे येथे आगमन झाले होते, अशी आख्यायिका जोशीमठाबाबत आहे. जेव्हा लक्ष्मण मेघनादाच्या शक्तीबाणाने बेशुद्ध झाले होते तेव्हा संजीवनी बूटीच्या शोधात हनुमान येथे आले होते. हनुमानास रोखण्यासाठी रावणाने कालनेमी नावाच्या राक्षसाला पाठवले. जोशीमठातच हनुमानाने कालनेमीचा वध केला. कालनेमीला हनुमानाने जीथे मारले ती भूमी आजही लाल मातीसारखी दिसते. महाभारत काळात येथे हनुमानाने पांडवांना दर्शन दिले होते. अज्ञातवासातून स्वर्गाच्या प्रवासादरम्यान पांडव जोशीमठात गेले होते, अशीही एक मान्यता आहे. या घटनेची आठवण म्हणून आजही लोक कापणीनंतर पांडव नृत्य करतात.
जोशीमठातील कलियुगाची भविष्यवाणी
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे नृसिंहांचे मंदिर आहे. या मंदिरातील वातावरणात अद्भूततेचा अंश असल्याचे जाणवते. नृसिंहांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. जोशीमठाजवळ बद्रीनाथाचे मंदिर आहे. वर्षभर या मंदिरात भाविकांची ये-जा सुरू असते. बद्रीनाथ धामची यात्रा नृसिंह मंदिराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. काहींच्या मते, या मंदिराची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती. कारण नृसिंहांना ते आपले इष्ट मानत असत. त्याचप्रमाणे नृसिहांच्या या मंदिरात आद्य शंकराचार्यांची गादी असल्याची मान्यता आहे. काही पौराणिक कथांनुसार, नृसिंह बदरी मंदिरात स्थापन केलेल्या नृसिंहाच्या मूर्तीतील डाव्या बाजूचा हाताचा सृष्टीच्या विनाशाशी संबंध असल्याचे सांगितले जाते. या मंदिरातील स्थापित मूर्तीतील डाव्या बाजूचा हात हळूहळू बारीक होत चालला आहे. ज्या दिवशी हा हात पूर्णपणे अदृश्य होईल, त्यादिवशी सृष्टीचा अंत होईल, अशी मान्यता आहे. या मंदिरातील स्थापित भगवान नृसिंहांची ही स्वयंभू मूर्ती असून, ती शाळीग्रामपासून तयार झालेली असल्याचे सांगितले जाते.
असे मानले जाते की, ज्या दिवशी भगवान नरसिंहाचा बारीक हात संपूर्णपणे नाहीसा होईल त्या दिवशी बद्रीनाथचा मार्गही बंद होईल. नर नारायण पर्वत एक होईल. भगवान बद्रीनाथ सध्या ज्या मंदिरात भक्तांना दर्शन देत आहेत त्या मंदिरात भगवान बद्रीनाथचे भक्तांना दर्शन होणार नाही. कारण नर-नारायण पर्वताच्या मिलनामुळे बद्रीनाथ धाम नाहीसे होईल. यानंतर भाविकांना भविष्य बद्रीत भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेता येईल.
भविष्याचे रहस्य
नर नारायण पर्वताच्या एकत्र होण्यामुळे जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता बंद होईल, तेव्हा भगवान बद्रीनाथ भविष्य बद्रीत भाविकांना दर्शन देतील. येथे एक खडक आहे ज्यावर एक अस्पष्ट आकृती आहे, असे म्हणतात की, ज्या दिवशी देवाची ही आकृती हळूहळू दिसू लागेल आणि हा आकार पूर्णपणे प्रकट होईल, त्या दिवसापासून भगवान बद्रीनाथ भविष्य बद्रीतच भक्तांना दर्शन देतील.
पं.राकेश झा