हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुढच्या २ दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही शहरं, मराठवाडा तसेच विदर्भातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, परभणी या जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, धुळे शहर परिसरात आज सकाळी किमान तापमानात चांगलीच घट झाली. आज किमान तापमान ५ अंश इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळेच धुळेकर वाढत्या थंडीने चांगलेच गारठल्याचे चित्र पहायला मिळाले. शहराचे किमान तापमान रविवारी ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. शनिवारी किमान तापमान ७ अंश एवढे होते. गेल्या चार दिवसांपासून धुळे शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे.
औरंगाबादमध्येही एका दिवसात तापमान तीन अंशांनी घसरलं आहे. रविवारी तापमान ९.४ अंश सेल्सियसवर असल्याची नोंद चिखलठाणा वेधशाळेने नोंदविली आहे तर पुढील तीन दिवस थंडीचा कडका कायम राहणार असल्याची माहिती आहे. हिंगोलीतही पारा घसरला असून गुलाबी थंडीने नागरिकांना हुडहुडी भरली आहे.