मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक गेल्या तीन दिवसांप्रमाणे सोमवारीही वाईट होता. चेंबूर आणि नवी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट होता. तर कुलाबा, माझगाव, वांद्रे कुर्ला संकुल, मालाड येथील हवा वाईट होती. वरळी, अंधेरी, भांडुप, बोरिवली येथील हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. मंगळवारीही चेंबूर आणि नवी मुंबईची हवा अतिवाईट असण्याचा अंदाज आहे. तर कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल आणि मालाड येथे हवेची गुणवत्ता वाईट असेल. गेल्या वर्षभरात ३६५ दिवसांपैकी २८० प्रदूषित होते. यात १०४ दिवस वाईट स्तराचे प्रदूषण, ३७ दिवस अतिवाईट प्रदूषणाचे आणि तीन दिवस गंभीर प्रदूषणाचे होते. गेल्या वर्षभरात केवळ ४० दिवस प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी ठरले, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चार विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली. हवेमध्ये बांधकामामुळे निर्माण होणारे प्रदूषण, वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण वाढत असताना वातावरणात वाढणाऱ्या थंडीमुळे हवेत प्रदूषके साचून राहत आहेत. परिणामी हवेत झालेला हा बदल आधीच आजारी असलेल्या व्यक्तींना अधिक जाणवत आहे. श्वास घेण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, प्रदूषकांमुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार याचा सामना करावा लागत आहे.
मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस होते. रविवारपेक्षा १.८ अंशांनी हे तापमान खाली उतरले. १० जानेवारीपासून यामध्ये अधिक घसरण होऊन हे तापमान १७ अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. १३ आणि १४ जानेवारीला किमान तापमानाचा पारा मुंबईत १४ अंशांपर्यंतही खाली उतरू शकतो. गेले दोन दिवस मुंबईमध्ये असलेले ढगाळ वातावरणही सोमवारी निवळलेले जाणवले. हे ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीमध्ये अधिक वाढ होऊ शकते, असे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
येत्या पाच दिवसांत म्हणजे १० जानेवारीपासून किमान तापमानात हळुहळू सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी घसरण होऊन रविवार, १५ जानेवारी म्हणजेच संक्रांतीपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थंडीची शक्यता आहे. कोकण विभागात किमान तापमान सरासरीइतके असू शकेल, असा अंदाज आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या २४ तासांमध्ये किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी घट झाली. नाशिकमध्ये किमान तापमानाचा पारा ८.३ अंशांपर्यंत खाली उतरला. तर जळगावमध्ये पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही किमान तापमान पाच अंशांपर्यंत खाली आले आहे. औरंगाबादमध्ये ५.७, उस्मानाबादमध्ये ८.५, परभणी येथे ९.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यातील तापमानही ८.६ अंशांपर्यंत घसरले. विदर्भाच्या विविध भागांमध्ये ८ ते १० अंशांपर्यंत किमान तापमान नोंदले गेले. गोंदिया ७, नागपूर ८.५, यवतमाळ ८.५ अमरावती ९.९ अंश सेल्सिअस अशी सोमवारी किमान तापमानाची नोंद झाली.
नवी दिल्लीतील अनेक शहरांहून घसरले…
उत्तर आणि ईशान्य भारतात अतिशीत वातावरण सोमवारीही कायम होते. नवी दिल्लीतील तापमान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक शहरांहून घसरले असून, सोमवारी पारा ५ अंशांवर होता. काश्मीरमध्ये अजूनही तापमान गोठणबिंदूच्या जवळच होते. तर पंजाब, राजस्थान, हरयाणा, बिहार, उत्तर प्रदेशात धुक्याचा दाट थर होता. यामुळेच उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवेवर दोन अपघातांत सात जणांचा अपघाती मृत्यू ओढवला. रेल्वेने २६७ गाड्या इतरत्र वळवल्या आहेत.