सुप्रिया सजित ढोबळे ( वय ३८, रा.कोलवडी, ता हवेली, जि. पुणे ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. अचानक घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या शिक्षिका पोदार स्कूलमध्ये कार्यरत होत्या. या घटनेने ढोबळे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून मुलीला धक्का बसला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया ढोबळे या वाघोली परिसरात राहायला आहेत. गेल्या एक वर्षांपासून त्या पोदार स्कूलमध्ये अध्यापनाचे काम करतात. आपल्या मुलीला सोडवून त्या स्कूलमध्ये निघाल्या होत्या. रस्त्यावरून दुचाकीने जात असताना व्हिइस्टेटकडे जाणाऱ्या रोडजवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला ट्रकची जोरात धडक बसली. धडक एवढी जोरात होती की त्यांना मारा लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
वाघोली परिसरात असणाऱ्या पोदार स्कूलमध्ये त्या एक वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकारी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना एकच धक्का बसला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
पुणे – नगर महामार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून अनेक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.