‘बारामतीचे पवार चुलते पुतणे म्हणजे चोरट्यांची टोळी आहे. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे’, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच कृषी प्रदर्शनावरुन देखील पडळकर यांनी पवारांना लक्ष्य केलं होतं. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवारांनी संबधित केलं, त्यावेळी दादांना पडळकरांच्या टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र पडळकरांचं नाव घेताच अजितदादा चांगलेच संतापले.
कोण कुठला उपटसुंभ, सोम्या गोम्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही!
“तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचारताय तो काय एवढा मोठा नेता नाहीये. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय…” अशा शब्दात अजितदादांनी टीकास्त्र डागलं. त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींनी देखील जनमाणसात ज्याची प्रतिमा आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारावे. आम्ही त्यांच्याबद्दल नक्की उत्तरं देऊ, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
“कृषी प्रदर्शनात शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितले, असा गंभीर आरोप पडळकरांनी पवार यांच्यावर केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी पडळकरांना थेट चॅलेंजच दिलं. ज्या कोणत्या माणसांना पवार साहेबांनी पैसे मागितले, त्यांना समोर उभं करा, मी राजकारण सोडून देतो… आहे का त्याची हिम्मत राजकारण सोडण्याची…”, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.
जनतेने इंदिरा गांधींना हरवलं, अजित पवार किस झाड की पत्ती!
“पवार कुटुंबियांना मी पुरून उरलोय. त्यांना मी सळो की पळो करुन सोडलंय. त्यामुळे अजित पवार निरुत्तर आहेत. बारामतीत जाऊन त्यांना योग्य भाषेत उत्तर देईल. पण सतत डिपॉझिट जप्त केलं, असं सांगणं हा एक माज आहे. जनतेने इंदिरा गांधींना हरवलं, अजित पवार किस झाड की पत्ती?” असा पलटवार पडळकरांनी अजितदादांवर केला. ‘जनमाणसात प्रतिमा असणाऱ्यांवर मी बोलतो’ या अजित पवार यांच्या टीकेलाही पडळकरांनी उत्तर दिलं. “आमचं सरकार असतानाही मी लोकांमध्ये जातोय. बहुजनांना मी जागरुक करतोय. आतापर्यंत गैरसमजातून त्यांच्या अवतीभवती जे लोक होते त्यांना बाजूला करतोय, म्हणून अजितदादांचा तिळपापड होतोय”