सन २०१९ पासून आजपर्यंत एसटी महामंडळात धोरणात्मक निर्णय लांबणीवर पडल्याने त्याचा परिणाम एसटी प्रवाशांवर झाला. जुन्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती रखडणे, नव्या गाड्यांची कमतरता आणि आयुर्मान पूर्ण गाड्यांतून प्रवासी वाहतूक यांमुळे एसटी प्रवासी अनधिकृत पर्यायाकडे वळत आहेत.
सन २०१७-१८ मध्ये महामंडळाने एकूण सरासरी एक कोटी ६६ लाखांहून अधिक फेऱ्या चालवल्या होत्या. त्यानंतर फेऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट झाली. भाडेतत्त्वावरील शिवशाहीचा समावेशानंतर यात काही हजार फेऱ्यांची वाढ झाली. मात्र, या गाड्यांचे अपघात सत्र सुरू झाले आणि प्रवासी एसटीपासून दुरावला गेला. करोनानंतर वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सन २०२२-२३ (ऑक्टोबरपर्यंत) सरासरी एकूण फेऱ्यांची संख्या ७४ लाखांपर्यंत खालावली आहे.
‘एसटी महामंडळात मार्गस्थ बिघाडांची आकडेवारी फेरीनिहाय संकलित केली जात नाही. महामंडळात मार्गस्थ बिघाडाचे प्रमाण प्रतिदहा हजार किलोमीटरमागे ठरवले जाते. २०१७-२०१८मध्ये मार्गस्थ बिघाडाचे प्रमाण ०.३१ टक्के होते. सन २०२२-२३मध्ये हा टक्का ०.३७ पर्यंत वाढला असून गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक बिघाड एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झाले आहेत, असे एसटी महामंडळाने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.
नादुरुस्ती खासगीच्या पथ्यावर
वाट पाहीन, पण एसटीने जाईल, असा विश्वास जोपासणाऱ्या राज्यातील प्रवाशांनी खासगी आणि अनधिकृत टप्पे वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, मॅक्सीकॅबचा पर्याय स्वीकारला असल्याचे एसटी अधिकारी सांगतात. एसटी गाड्या नादुरुस्त असणे, मार्गातील बिघाड हा खासगी वाहतुकीच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत राज्यात ३४ हजार ६४६ वेळा विविध कारणामुळे एसटी रस्त्यांवर थांबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
एसटीमधील वारंवार उद्भवणाऱ्या घटना
– इंजिन बिघाड
– इलेक्ट्रिकल नादुरुस्त
– ट्रान्समिशन फेल
– ऍक्सेल संबंधित
– रोड व्हील
– सस्पेन्शन, ब्रेक अकार्यक्षम
वर्ष – सरासरी फेऱ्या – मार्गस्थ बिघाड संख्या- मार्गस्थ बिघाड दर
२०१७-१८- १,६६,६९,६७१ -६३,२८८ – ०.३१
२०१८-१९- १, ६६,९२,२०६ – ६७,३२३ – ०.३४
२०१९-२०- १,६२,५२,४८३ – ६३,८६६ – ०.३४
२०२०-२१- ५९,९०,९३१ – १८,९७१ – ०.२२
२०२१-२२- ५०,४५,३११ -१७,२९७ – ०.२५
*२०२२-२३- ७४,१६,५२८ -३४,६४६ – ०.३७
(* २०२२ ऑक्टोबरपर्यंत
– प्रति दहा हजार किमीमागे मार्गस्थ बिघाडाचा दर आहे.
– यात्रा आणि विशेष फेऱ्यांचा यात समावेश नाही
– स्तोत्र – एसटी महामंडळ )