याआधी दापोली इथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. रामदास कदम यांनी शिवसेना विरोधात काम केले होते असाही थेट आरोप त्यावेळी भास्कर जाधव यांनी केला होता. परंतु, त्याला उत्तर दिले होते लवकरच मी मतदार संघात जाऊन त्याला उत्तर देईन असे रामदास कदम त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर आता गुहागर मतदारसंघात येत असलेल्या खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात रामदास कदम यांनी थेट जाहीर सभा ठेवली आहे. या सभेला एकनाथ शिंदे गटाचे नेते म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम मार्गदर्शन करणार आहेत. आमदार योगेश कदम हेही यावेळी उपस्थित असणार आहेत.
खरंतर, याच गुहागर मतदारसंघातून रामदास कदम यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यांना सेनेचे भाजपाचे तत्कालीन बंडखोर उमेदवार डॉ. विनय नातू व राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांचं आव्हान होतं. त्या निवडणुकीत रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागला होता. पण या सगळ्यानंतर आज ते जाहीर सभेत काय तोफ डागणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.