आसोला येथे किशोर कीर्तने व गणपत कीर्तने असे शेजारी राहत होते. हे दोघेही जवळा बाजार येथे मजुरीसाठी जात असत. जवळा बाजार येथील एका महिलेसोबत दोघांचीही ओळख होऊन मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते.
मयत किशोर हा विवाहित होता, त्याला दोन वर्ष वयाचा मुलगा देखील आहे. आरोपी गणपत कीर्तने हा मात्र अविवाहित आहे. गणपत व जवळा बाजार येथील महिलेच्या जवळिकीवरून किशोर त्या महिलेस मारहाण करीत होता.
२४ जानेवारी २०१८ रोजी रात्री संबंधित महिला किशोर कीर्तने याच्या घरी गेली. किशोरच्या पत्नीला तिने समजावून सांगण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी आरोपी गणपत कीर्तने याच्या घरी महिलेने किशोरला फोन करून बोलवून घेतले.
तू महिलेला सतत मारहाण का करतोस, या कारणावरून किशोर कीर्तने व आरोपी गणपत कीर्तने यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये गणपत कीर्तने याने घरातील मोठ्या धारदार चाकूने किशोर कीर्तने याच्या पोटात खुपसून खून केला.
गुन्ह्यातील चाकू सोबत घेऊन गणपत शेताच्या दिशेने पळून गेला. खून खटल्यातील साक्षीदार व किशोरची पत्नी सुजाता व आरोपी गणपतचा शेजारी उत्तम धबडगे यांनी पाहिले. त्यानंतर किशोरची आई कमलाबाई यांनी या ठिकाणी येऊन आरोपीला पळून जाताना पाहिले. यानंतर जखमी अवस्थेतील किशोर कीर्तने याला जवळा बाजार येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याचे सांगितले.
हेही वाचा : मम्मी-पप्पा दार उघडा, मुलगा हाका मारत राहिला, मात्र बंद दरवाजाआड घडत होतं भयंकर
मयत किशोरची आई कमलाबाई ज्ञानजी कीर्तने यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस स्टेशन येथे गणपत उर्फ प्रभाकर कीर्तने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुरावा आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायालय वसमत येथे दोषारोप पत्र दाखल केले. त्यानंतर आरोपी गणपत कीर्तने यांच्याविरुद्ध वसमत येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवून यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ११ साक्षीदारांची साक्षर तपासणी केली. त्यानंतर आरोपी गणपत कीर्तने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्या जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. शी. देशमुख यांनी सुनावली.
हेही वाचा : आई मला माफ कर, तुला चांगले दिवस दाखवायची इच्छा होती, CA ची तयारी करणाऱ्या तरुणाचं टोकाचं पाऊल