‘बीडीडी’ प्रकल्पाला आडकाठी नाहीच; प्रकल्पात काहीही नियमबाह्य दिसत नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

मुंबई: ‘वरळी, नायगाव (दादर) व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाने जो आराखडा तयार केला आहे तो या परिसरातील लोकसंख्येची घनता प्रचंड प्रमाणात वाढवून मूळ रहिवाशांसह अन्य नागरिकांचेही आरोग्य धोक्यात घालणारा आहे. दोन इमारतींमध्ये पुरेशी मोकळी जागा नसेल, घरांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश नसेल, अशाप्रकारे उत्तुंग इमारती खेटून उभ्या राहणार आहेत. कारण खासगी विकसकांना विक्रीच्या उत्तुंग इमारती उभारायच्या आहेत’, असा आरोप करत दोन शहरनियोजन तज्ज्ञांनी केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने गुरुवारी निकाली काढली.

तसेच ‘या प्रकल्पातील इमारतींचे मंजूर बांधकाम आराखडे हे डीसीपीआर-२०३४मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे किंवा विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम ३३(९)मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचे दिसत नाही. त्यामुळे याचिकेतील मुद्द्यांमध्ये तथ्य नाही’, असा निर्वाळाही हायकोर्टाने आपल्या निर्णयात दिला.

शहर नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ व नगररचनाकार शिरीष पटेल व सुलक्षणा महाजन यांनी ही जनहित याचिका केली होती. ‘या तिन्ही ठिकाणच्या चाळींमधील रहिवाशांची मूळ घरे अवघ्या १६० चौ. फुटांची होती. मात्र, त्या चाळींमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा मिळत होती. शिवाय त्यांना पुरेशी मोकळी जागाही होती. पुनर्विकास योजनेत त्यांना पाचशे चौ. फुटांचे टुबीएचके घर देण्यात येणार असले तरी पुनर्वसनाच्या या उत्तुंग इमारती जवळपास खेटूनच असणार आहेत. एकूण जमिनीच्या विशिष्ट भूखंडावर या इमारती बांधण्यात येणार आहेत. परिणामी रहिवासी पुरेसा प्रकाश व हवा आणि मोकळी जागा यापासून वंचित राहणार आहेत.

रहिवाशांना सुटसुटीत घरे देण्याऐवजी राज्य सरकार व म्हाडाने तब्बल १५ हजार कोटी रुपयांहून अधिकची कमाई करण्याचा हेतू ठेवून खासगी विकसकांना कंत्राटे दिली आहेत. यामुळे नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावर गदा येईलच. शिवाय रहिवासी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. शिवाय परिसरातील पायाभूत सुविधांवरही प्रचंड ताण येईल’, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकार व म्हाडाचे याचे खंडन केले होते.

हायकोर्ट निकालात म्हणते…

‘या प्रकल्पाबाबत पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवाल मिळवण्यात आला आहे. तसेच सामाजिक-आर्थिक तपासणीचाही अहवाल आहे. मूळ १६० चौ. फुटांच्या घराच्या बदल्यात पाचशे चौ. फुटांचे (कार्पेट) टुबीएचके घर दिले जाणार आहे. शिवाय घरांचे डिझाईन आखताना नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहील, असेही नियोजन केल्याचे दिसत आहे. सॅम्पल फ्लॅटही तयार करण्यात आला आहे. त्यालाही कोणीच आक्षेप घेतलेला नाही.

सूर्यप्रकाश व खेळती हवा समाधानकारक व निकषांची पूर्तता करणारी असेल, असे ईआयए आणि गृह यांच्या अहवालांतही स्पष्ट करण्यात आले आहे. हे अहवाल तज्ज्ञांनीच तयार केले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या मतांवर कोर्ट आपली मते लादू शकत नाही. बांधकामांचे मंजूर आराखडे हे डीसीपीआर व डीसीआरच्या तरतुदींशी विसंगत असल्याचे दाखवणारेही काहीच नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांचे म्हणणे स्वीकारता येणार नाही. तसेही म्हाडा व खासगी विकसकांना डीसीपीआरमधील तरतुदी व नियमांचे पालन करूनच बांधकाम करावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात कोर्टाने हस्तक्षेप करण्याचे कोणतेच कारण नाही’, असे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला व न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठाने १९ डिसेंबर रोजी राखून ठेवलेल्या आणि गुरुवारी जाहीर केलेल्या आपल्या निर्णयात स्पष्ट केले.

Source link

bdd projectbdd project nothing illegalHigh Courtबीडीडी प्रकल्पमुंबई उच्च न्यायालयहायकोर्ट
Comments (0)
Add Comment