भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी चंग बांधलाय.. परभणी लोकसभा निवडणूक जिंकण्याची जबाबदारी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर सोपवलीय. अशातच पंकजांचा पाठीराखा भाऊ महादेव जाणकर परभणीतून यंदा शड्डू ठोकण्याची चिन्हे आहेत. तशी तयारीही ते करतायत. गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंना ते आपली बहीण मानतात. दोघांमधल्या या बहीण-भावाच्या नात्याला गोपीनाथ मुंडे असल्यापासून सुरूवात झाली. ज्या भाजपात पंकजा मुंडे यांना पर्यायी ओबीसी चेहरा म्हणून कराडांकडे पाहिलं जातं, त्याच कराडांकडे परभणीची जबाबदारी असणं आणि त्यातही तिथेच जाणकरांनी तयारी सुरू करणं हा निव्वळ योगायोग आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो… कारण, परभणी लोकसभा मतदारसंघात मुंडे समर्थकांची संख्याही मोठी आहे..
- लोकसभा मतदारसंघात परभणीतील ४, तर जालना जिल्ह्यातील २ अशा ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश
- १९९८ चा अपवाद वगळता १९८९ पासून २०१४ पर्यंत परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला
- लोकसभेच्या १९९८ च्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली
- या लढतीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव, मात्र १९९९ ला सेनेने मतदारसंघ पुन्हा जिंकला
- परभणीत ओबीसी समाजातील मतदारांचं प्राबल्य सर्वाधिक
- यात विशेषत: हटकर आणि धनगर समाजाची संख्या अधिक प्रमाणात
- आत्तापर्यंच्या निवडणुकीत ओबीसी मतदारांची मतं ही शिवसेनेच्या पारड्यात
- जानकर २०२४ ला लढले तर ती मतं विभागण्याची शक्यता
सध्या परभणीत शिवसेनेचे संजय जाधव हे खासदार आहेत. याच मतदारसंघासाठी २०२४ साठी भाजपकडून बबनराव लोणीकर, त्यांचा मुलगा राहुल लोणीकर आणि जिंतूर मतदारसंघांच्या मेघना बोर्डीकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
“२०२४ ची निवडणूक मी माझ्या ताकदीने माझ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. बेरजेच्या राजकारणाचा फटका रासपला बसणार नाही. एनडीए किंवा यूपीए आम्हाला विचारात घेणार नसेल तर याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न मी २०२४ ला करणार आहे”, असं रासपच्या महादेव जानकर यांनी म्हटलंय.
परभणी जिल्ह्यात निवडणूक लागते तेव्हा तिथे पंकजा मुंडेंच्याही जंगी सभा होतात.. पंकजा मुंडे या नाराज असल्याची सातत्याने चर्चा होते आणि त्यामुळे मुंडे समर्थकही अस्वस्थ असतात.. परिणामी जानकरांसारखा उमेदवार परभणीत उतरला तर ओबीसी मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होण्याचा धोका भाजपसमोर आहे.. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्ष बाकी आहे, पण त्यापूर्वी जानकरांनी परभणीत येणं हे करांडांची डोकेदुखी वाढवणारं ठरू शकतं.