Uddhav Thackeray: पूरग्रस्तांना सावरण्याचे आव्हान; केंद्रीय अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ विनंती

हायलाइट्स:

  • पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी.
  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र.
  • विमा कंपन्यांना तातडीने निर्देश देण्याची केली विनंती.

मुंबई : पुरामुळे जे व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर मिळावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ( Uddhav Thackeray Writes To Nirmala Sitharaman )

वाचा: ठाकरेंचा आदेश निघाला; शिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत माहिती दिली. ‘जुलै महिन्यात मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सर्व पूरग्रस्त भागांमध्ये महसूल यंत्रणेस तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक दुकाने, वाहने आणि घरे यांचे नुकसान झाल्याने लोक विमा कंपन्यांकडून विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपण आजच काही विमा कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत विमा कंपन्यांनी पंचनाम्यांच्या आधारे एकूण विम्याच्या ५० टक्के रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयास आणि आयआरडीएला योग्य ते निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील जम्मू काश्मीर आणि केरळमधील मोठ्या पुराच्या वेळेला अशा प्रकारे केंद्र सरकारने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते’ असे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

वाचा: अहमदनगरमध्ये करोनाचा धोका वाढला; ‘त्या’ भागात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन

प्रक्रिया सूटसुटीत करावी

दावे निकाली काढताना त्यांची नियमावली दाखवून अडचणीत असलेल्या विमाधारक उद्योग व्यावसायिकांना आणखी अडचणीत आणू नये. दावे निकाली काढण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी करावी, पॉलिसी घेतानाचे प्रश्न आता दावे निकाली काढताना विचारू नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. रोगराई पसरू नये म्हणून पूरग्रस्त भागाची स्वछता लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे दावे निकाली काढण्यासाठी नुकसान झालेल्या वस्तू आणि वाहने आहे त्या नुकसानग्रस्त स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही. म्हणून महसूल यंत्रणेने पंचनामे करताना झालेल्या नुकसानीची सुस्पष्ट छायाचित्रे काढावीत, महसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावीत व त्यावरून नुकसानग्रस्ताना विम्याची रक्कम देण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सवलतीच्या व्याज दरात कर्ज देण्याची बँकांना विनंती

मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधीसमवेतही बैठक घेतली. या बैठकीच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकिंग व्यवसाय त्वरित सुरू करावा. ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना वर्किंग कॅपिटल- खेळते भांडवलाकरिता सवलतीच्या व्याज दरात कर्ज द्यावे. ज्या लोकांना कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. त्यांना काही महिन्यांची सवलत द्यावी अशा सूचना बँकांना दिल्या असून आपल्यास्तरावरून देखील असे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, रायगड, रत्नगिरी, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह ११ विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाचा: फोन टॅपिंग: ‘रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?’

Source link

maharashtra flood reliefmaharashtra floodsmaharashtra floods latest newsuddhav thackeray latest newsuddhav thackeray writes to nirmala sitharamanअजित पवारउद्धव ठाकरेनिर्मला सीतारामनपूरग्रस्तविमा
Comments (0)
Add Comment