पुणे शहरात दहा ठिकाणी दाखल झालेल्या दहाही गुन्ह्यात एकच मोडस ऑपरेंडी वापरुन वृद्धांना फसवल्याचं समोर आलं आहे. तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नवऱ्याला लॉटरी लागली आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना आपल्या गाडीवर बसून एखाद्या कानाकोपऱ्यात न्यायचं. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन त्याची लूट करायची.
अफताफ उर्फ साजिद अहमद शेख ( वय ५२ वर्ष, रा. कमल नयन बजाज हॉस्पिटल फातिमानगर, पुणे) असा या आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत असून एकच पद्धत वापरून पुण्यात किमान दहा ठिकाणी दहा वेगवेगळ्या जणांना त्याने फसवल्याचा आरोप आहे. मात्र दहावी फसवणूक करताना पोलिसांना आरोपीचा छडा लागला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी अफताफ याने पुणे शहरातल्या 1) वारजे, 2) निगडी, 3) वाकड, 4) देहू रोड, 5) चंदन नगर 6) कोंढवा 7) भारती विद्यपीठ, 8) लोणी काळभोर 9) सिंहगड रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची लूट केली होती. मात्र दहाव्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपीचा छडा लागला आणि सिंहगड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 15 तोळे सोनं, एक बुलेट जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा : ३५ बँकांचे १०१ एटीएम कार्ड घेऊन फिरायचे, ठाण्यात धुडगूस घातलेल्या टोळीच्या अखेर मुसक्या आवळल्या
आरोपीने पुण्यात ९ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे गुन्हे केल्याच निष्पन्न झाले असून पोलिस या आरोपीने असे अजून कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहेत. या आरोपीकडून पोलिसांनी ९ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख रुपये किमतीची बुलेट असा जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिंहगड पोलिसानी अटक केलेल्या आरोपीला कोर्टात हजर केल असता कस्टडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : भांडी धुताना अंगावर शिंतोडे उडाले, रस्त्यात दोघांचा वाद, जीव गमावला तिसऱ्याच व्यक्तीने