डॉ. डी. वाय. पाटील प्रीस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

डॉ. डी. वाय. पाटील प्रीस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

पिंपरी – नुकतेच डॉ. डी. वाय.पाटील प्रीस्कूलने आपला वार्षिक क्रीडा दिन आयोजित केला होता. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर पिंपरी येथील प्रशस्त क्रीडा प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

विश्वस्त डॉ.स्मिता जाधव यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. “आमच्या प्रीस्कूलमध्ये सर्वच विजेते आहेत, कारण आम्ही नेहमी मानतो की शर्यतीत भाग घेणे आणि पूर्ण करणे हे शर्यत जिंकण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. या लहान वयात शिस्त, आदर, टीमवर्क आणि नेतृत्वाबरोबर मैदानी खेळ आणि खेळांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्ती त्यांच्यातील नेतृत्व क्षमता वाढीस लागावी हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे” असे डॉ. स्मिता जाधव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

मुख्याध्यापिका सौ.वैशाली चौधरी यांनी सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे स्वागत केले.

पालक आणि विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचा आनंद लुटता यावा यासाठी एक मोठे बैठक रिंगण तयार केले होते. प्रवेशद्वार सुशोभित करून मैदान पोस्टर्सने आणि फुग्यानी सजविण्यात आले होते.

प्रीस्कूलच्या चार शाखेतील विद्यार्थी यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी वर्गाचा सहभाग होता. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे ध्वज घेऊन गटाचे प्रतिनिधित्व केले. नंतर सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, पॅराशूट प्ले आणि हुला हूप नृत्य सादर केले. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उर्जेने झुंबा आणि एरोबिक्स केले तर नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी पीटी केली.

या क्रीडा स्पर्धेत हर्डल्स, हुला हूप रेस, इंद्रधनुष्य रंगांची शर्यत, शाळेला जाण्याची शर्यत, भागीदारांची शर्यत आणि इतर अनेक शर्यतींमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

शेवटच्या सत्रात पालकांनी देखील चिकन डान्समध्ये सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला. सोनाली श्रीमानी यांनी सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.

Comments (0)
Add Comment