कालच्या घटनेवर वळसे पाटील यांनी आज सकाळी ट्विट करून आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्यांनी म्हटले आहे. ‘भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
या मतदारसंघातून काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडीने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. प्रत्यक्षात ऐनवेळी डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
तांबे यांना काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे भाजपची ऑफर दिली होती. तेव्हापासून सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. यानंतरही काँग्रेसने डॉ. तांबे यांना उमेदवारी दिली आणि शेवटी हे नाट्य झाले.
या संपूर्ण घटनेत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला धक्का दिल्याचे मानले जात आहे. तसेच काँग्रेस नेत्यांच्या गाफीलपणावर आणि निर्णय प्रक्रियेवरही बोट ठेवले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील इतर घटकपक्ष या प्रक्रियेपासून दूरच होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात काहीही भाग घेतल्याचे दिसून आले नाही. ही घटना घडल्यानंतरही काही काळ केवळ भाजप आणि काँग्रेसचे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
हेही वाचा : तांबे पितापुत्रांनी काँग्रेसशी दगाफटका केलाय, सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार नाही: नाना पटोले
आता वळसे पाटील यांनी यावर ट्विट करीत भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष आणि उमेदवार फोडाफोडासाठी भाजपच्या ऑपरेशन कमळची चर्चा होत असते. तोच धागा पकडून वळसे पाटील यांनी याही घटनेत भाजपच्या ऑपरेशन कमळचा संदर्भ जोडला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ह.भ.प. बंडातात्या कराडकरांची तब्येत बिघडली, पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल