परभणीचा भूतकाळ हा जातीय हिंसाचाराने नेहमीच प्रशासनाला वेठीस धरल्याचा आहे. पण सय्यद कुटुंबातील सदस्यांनी दाखवलेल्या दर्यादिलपणाचं कौतुक होतंय. आजपर्यंत धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्याचमुळे हिंदू मुस्लिम यांच्यातील दरी करण्याचाच आमचा या कृतीमागील हेतू असल्याचं सय्यद कुटुंबाने सांगितलं.
१३ ते १७ जानेवारी दरम्यान शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेला कार्यक्रम कुठे घ्यायचा, हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर प्रश्न होता. त्याचवेळी सय्यद कुटुंबाने आपली ६० एकर जमीन शिवपुराण कथेसाठी देऊ केली. या कार्यक्रमासाठी त्यांनी १५ एकरांवर पेरलेली तूर आणि चार एकरांवर पेरलेले हरभऱ्यावर ट्रॅक्टर फिरवला.
ज्यांनी ही जमीन शिवपुराण कथेसाठी दिली त्या शोएबचे वडील अबुबकर भाईजान म्हणाले, “आमच्या हिंदू बांधवाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आमच्या जमिनीचा वापर होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. धार्मिक सलोखा सगळ्यांनी राखायला हवा. हाच खरा भारत आहे. परभणीत भूतकाळात जातीय संघर्ष पाहिला असून विविध समाजातील दरी मिटवण्याचा आमचा या कृतीमागील हेतू आहे”
शोएबचे मामा सय्यद अब्दुल कादर म्हणाले, “गेल्या महिन्यात तबलीग जमात इज्तेमा हा मुस्लिम धर्मीयांचा मोठा कार्यक्रम होता. त्यावेळी आम्हाला हिंदू बांधवांनी जमीन दिली होती. ज्या कार्यक्रमासाठी सुमारे तीन लाख मुस्लिम लोक उपस्थित होते. आणि आता जेव्हा आमचे हिंदू बांधव त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जमीन शोधत होते, तेव्हा त्यांना जमीन देणे आमचे कर्तव्य होते”.