परभणी जिल्ह्यातील डिग्रस कुरे येथील १० जण उसाचे वाढे घेऊन टाटा मॅजिक ऑटोने (एमएच १३ एएन ६५८४ ) औंढा नागनाथकडे येत होते. त्यांची गाडी जवळाबाजार ते औंढा नागनाथ मार्गावर बाराशिव कारखान्याजवळ आले असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातामुळे टाटा मॅजिक ऑटो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. ऑटोमधील उसाच्या वाढ्यावर बसलेले सोपान कुरे व किसन वाहुळे जागीच ठार झाले. पोलिसांनी या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या विष्णू विठ्ठल कुरे, ज्ञानोबा हरिभाऊ कुरे, सोपान नीलकंठ कुरे, मोतीराम बाळासाहेब कुरे, गोपाल नरहरी कुरे, लक्ष्मण संभाजी कदम यांना उपचारासाठी तातडीने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे.
वाचाः तापमानाचा पारा ‘थंडा’वला! मुंबईतील तापमानाचा या मोसमातील नीचांक, सांताक्रूझ १३.८ तर कुलाबा १६.२
दुचाकी अपघातात दोघांचा गेला जीव
तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ते सवना मार्गावरील वळण रस्त्यावर दुचाकी अपघातात दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (१५ जानेवारी) पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. विशाल भारत नायक (रा. सवना), सुनील लक्ष्मण चौधरी (रा.बोरी, ता. जिंतूर) अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाचाः पुण्यात हे चाललंय काय; महिलेने गाडी हळू चालवायला सांगितलं, गावगुंडांनी थेट कोयताच काढला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सुनील हे त्यांचे मित्र संदीप बालाजी शिंदे यांच्यासोबत शनिवारी सेनगाव तालुक्यातील सवना येथे नातेवाइकांकडे आले होते. दरम्यान, सुनील त्यांचा मित्र संदीप व त्यांच्या मामाचा मुलगा विशाल हे तिघे दुचाकी वाहनावर सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील यात्रेमध्ये गेले होते. यात्रेत फिरून पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते परत सवना गावाकडे निघाले होते. या वेळी गोरेगाव ते सवना मार्गावर असलेल्या वळण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये सुनील चौधरी व विशाल नायक यांचा मृत्यू झाला,तर संदीप शिंदे गंभीर जखमी झाले. दरम्यान, मृत सुनील चौधरी हा मुंबई येथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असून तो दोन वर्षांपूर्वी भरती झाले होते.काल मकर संक्रांत होती या सणाच्या दिवशीच दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.