पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेला व्यक्ती पाटोळे व मारेकरी हे एका परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीचा भाऊ आणि प्रेम पाटोळेमध्ये वाद झाले होते. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी पाटोळेने आरोपीचा भाऊ भरत काळे याला बेदम मारले होते. याचा राग मनात धरून भरत काळेच्या भावाने सूड घेण्याचे ठरवले. गेल्या काही दिवसांपासून भरत काळे याच्याकडून प्रेम पाटोळेवर पाळत ठेवली जात होती. रविवारी प्रेम पाटोळे महात्मा फुले पेठेतील मध्यवर्ती अग्निशमन केंद्राच्या परिसरातून निघाला होता. त्यावेळी टोळक्याने त्याला अडवले. माझा भाऊ भरत काळेला मारहाण केली का? अशी विचारणा करून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी प्रेम पाटोळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. परंतु, पाटोळेने तिथून वेळीच पळ काढला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. यामध्ये पाटोळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी अजूनही फरार आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.
पुण्यात भाजपची पोस्टरबाजी
काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांकडून कोयता गँगच्या दहशतीला चाप बसवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्या बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली होती. पोलिसांनी पिस्तुलासह १४५ कोयते जप्त केले होते. १३ जणांवर मकोकानुसार कारवाई करण्यात आली होती. याशिवाय, पुण्यातील कोयता पुरवणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानावरही पुणे शहर पोलीस दलाच्या युनिट क्रमांक १ ने छापा टाकला होता. या कारवाईत तब्बल १०५ कोयते पोलिसांनी जप्त करण्यात आले होते.
इतक्या मोठ्या कोम्बिंग ऑपरेशननंतर कोयता गँगची दहशत कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कोयत्याने हल्ले करण्याचे फॅड हे सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे पुण्यात कोयत्याने हल्ला होण्याची आणखी एक घटना घडली आहे. महात्मा फुले पेठेत झालेल्या या कोयता हल्लाप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.