मुंबईच्या पश्चिम व उत्तर उपनगरांना दोन मार्गिकांद्वारे जोडणाऱ्या मेट्रो २ अ व मेट्रो ७चा पहिला टप्पा गेल्या एप्रिलमध्ये सुरू झाला. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या पूर्व भागातील आरे स्थानकापासून ते रेल्वेच्या पश्चिमेकडील डहाणूकरवाडीपर्यंतचा (कांदिवली) हा सलग मार्ग आहे. एकप्रकारे कमानीच्या स्वरूपातील ही मार्गिका आहे. ३५ किलोमीटरचा हा कमानीच्या स्वरूपातील प्रवासाचा अनुभव मुंबईकरांना मिळणार आहे. ही कमान एप्रिलमध्ये निम्मीच सुरू झाली. आता मेट्रो २ अ व मेट्रो ७ ही मार्गिका संपूर्ण तयार झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उपनगरीय रेल्वेच्या पूर्वेकडे गुंदवली ते पश्चिमेकडील अंधेरी पश्चिम अर्थात डी. एन. नगरपर्यंत संलग्नता मिळणार आहे.
मेट्रो २ अ ही मार्गिका आनंदनगर (दहिसर पूर्व) ते डी. एन. नगर अशी आहे. तर मेट्रो ७ ही मार्गिका दहिसर पूर्व ते गुंदवली अशी आहे. एप्रिलमध्ये ही मार्गिका अनुक्रमे आनंदनगर ते डहाणूकरवाडी व दहिसर ते आरे अशी सुरू झाली होती. आता ही मार्गिका गुंदवली ते डी. एन. नगर अशी पूर्ण सुरू होत आहे. ‘मेट्रो २ अ’ची एकूण लांबी १८.६० किमी तर मेट्रो ७ची एकूण लांबी १६.५० किमी आहे. यानुसार कमानीच्या स्वरूपातील ३५ किलोमीटर लांबीची अखंड संलग्नता लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे. याद्वारे पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या उत्तर ते मध्य मुंबई (दहिसर ते अंधेरी) भागात पूर्व-पश्चिम जायचे असल्यास रस्त्यावरील वाहतूक टाळून मेट्रोने जाता येणार आहे.
‘मेट्रो १’लाही जोडणी
अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक हे मेट्रो १वरील (वर्सोवा-घाटकोपर) डी. एन. नगर तर गुंदवली स्थानक हे पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो स्थानकाजवळ आहे. यामुळे ही कमान लवकरच पूर्ण रूपात कार्यान्वित झाली, की मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ला मेट्रो १ मार्गिकेशीदेखील संलग्नता मिळेल. त्यामुळे दहिसरवरून थेट वर्सोवा किंवा घाटकोपर गाठता येणार आहे.